Join us  

शरद पवार यांनी घेतली राज्यपालांची भेट, राजकीय तर्कवितर्कांना उत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 4:19 PM

एकीकडे कार्यक्षेत्रातील हस्तक्षेपावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच शरद पवार यांनी थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उत आला आहे.

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. एकीकडे कार्यक्षेत्रातील हस्तक्षेपावरून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच शरद पवार यांनी थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्कांना उत आला आहे.

आज दुपारी शरद पवार यांनी राजभवन येथे जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेसुद्धा उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार आणि राज्यपालांमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या राज्यात असलेल्या परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत आहे. महिनाभरापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीका झाली होती. तसेच भाजपाचे नेतेही सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. त्यामुळे राज्यपाल अधिकच चर्चेत आहेत.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही दोन दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्यासोबत चर्चा केली होती.

 

टॅग्स :शरद पवारमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस