Join us  

“संघ प्रवृत्तीला उत्तर देणार, भाजपचे कपटकारस्थान उधळून लावणार, भारतीय संविधानाचा विजय असो”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:13 AM

कपटकारस्थान यशस्वी होणार नाही. संघ प्रवृत्तीला भारतीय संविधान जोरदार उत्तर देणार, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकींचे सत्रही वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.

महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी शरद पवार आता मैदानात उतरल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेतही शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीला शरद पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेतेही होते. शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

भारतीय संविधानाचा विजय असो

अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीने घडवून आणलेल्या कपटकारस्थानाला भारतीय राज्यघटना उधळून लावणार. संघ प्रवृत्तीला भारतीय संविधान जोरदार उत्तर देणार. कपटकारस्थान यशस्वी होणार नाही. भारतीय संविधानाचा विजय असो, या शब्दांत हल्लाबोल केला आहे. 

१६ आमदारांना अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा बजावरणार?

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटिसा बजावल्या जाऊ शकतात. यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आले. यासंदर्भात कारवाई करायची असेल, तर त्याचे स्वरुप कसे असेल, यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास विधिमंडळात दाखल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील प्रभू हेही विधिमंडळात हजर होते. तब्बल तीन ते चार तासांच्या चर्चेनंतर आता या १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात कायद्याची बाजू समजून घेण्यासाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते.  

टॅग्स :अमोल मिटकरीराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ