मंगलप्रभात लोढांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 19:15 IST2022-11-30T19:14:04+5:302022-11-30T19:15:02+5:30
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघातच हे जोरदार आंदोलन करण्यात आले.

मंगलप्रभात लोढांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबई- गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा...पन्नास खोके एकदम ओके... छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आज पुन्हा एकदा आक्रमक झालेली पहायला मिळाली.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व कार्याध्यक्षा राखीताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज मंगलप्रभात लोढा यांच्या मतदारसंघातच हे जोरदार आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते.
शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही- मुख्यमंत्री
लोढा यांच्या या विधानावरून राज्यातील राजकारणा तापले आहे. तसेच विरोधी पक्षांकडून माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. तर या विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी थेट बोलणे टाळले. तसेच शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असे सांगितले.