दाऊदशी संबंधित प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:09 IST2025-11-14T06:08:53+5:302025-11-14T06:09:21+5:30
Nawab Malik News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुुटुंबीयांच्या मालकीच्या कंपनीला दाऊद इब्राहिमशी संबंधित पीएमएलए प्रकरणात आरोपमुक्त करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला. आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

दाऊदशी संबंधित प्रकरणात नवाब मलिकांना दिलासा नाहीच
मुंबई - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कुुटुंबीयांच्या मालकीच्या कंपनीला दाऊद इब्राहिमशी संबंधित पीएमएलए प्रकरणात आरोपमुक्त करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला. आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
मलिक आणि त्यांचे नातेवाईक ‘सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरचा कारभार सांभाळतात. ही कंपनी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप आहे. कंपनीला आरोपमुक्त करण्यात यावे, अशी विनंती मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाला केली.
न्या. सत्यनारायण नावंदर यांनी ११ नोव्हेंबर रोजी कंपनीचा अर्ज फेटाळला. मलिक यांनी ‘डी’ कंपनीची सदस्य हसिना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांच्याशी संगनमत करून बेकायदा मालमत्ता हडप केल्या. त्यामुळे ते गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. ईडीने २०२२ मध्ये मलिक यांना अटक केली होती. ते सध्या जामिनावर आहेत.