Join us

Nawab Malik Drugs allegation : 'फडणवीसांनी शरद पवारांऐवजी मुंबई पोलिसांकडे पुरावे द्यावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 15:29 IST

मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता

ठळक मुद्देदिवाळीची वाट पाहण्याऐवजी किंवा शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्याऐवजी, फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडेच पुरावे सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे, असे तहसीन पुनावाला यांनी म्हटलंय.

मुंबई - नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विट करुन थेट माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला होता. अमृता फडणवीस यांच्या फोटो ट्विट करत ड्रग्स पेडलर्सशी संबंध असल्याचा आणि महाराष्ट्रातील ड्रग्स व्यवसायाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला. तसेच नवाब मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पुरावे आपण दिवाळीनंतर शरद पवार यांच्याकडे सोपविणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या आरोपावरही आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याला आता नवाब मलिक यांनीही प्रत्युत्तर दिले असून, है तैयार हम असे केवळ तीन शब्दांचे ट्विट केले. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. तर, फडणवीस यांच्या आरोपानंतर उद्योजक आणि विश्लेषक तहसीन पुनावाला यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित आहेत, तर दिवाळीची वाट पाहण्याऐवजी किंवा शरद पवार यांच्याकडे तक्रार करण्याऐवजी, फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडेच पुरावे सादर करणे त्यांचे कर्तव्य आहे, असे तहसीन पुनावाला यांनी म्हटलंय. तसेच, साहजिकच ते केवळ बडबड करत आहेत, असेही पुनावाला यांनी ट्विट करुन म्हटलंय

काय होता मलिक यांचा आरोप

ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनवाब मलिक