Join us  

Nawab Malik: भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल; मलिकांच्या अटकेनंतर तलवार दाखवणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 8:36 AM

नवाब मलिकांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे.

मुंबई -  महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना बुधवारी दुपारी ईडीनं अटक केली आहे. जवळपास ८ तास चाललेल्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर नवाब मलिकांना जेजे हॉस्पिटलला आणण्यात आले. त्यानंतर पीएमएलए कोर्टात मलिकांना हजर केले. सुनावणीवेळी ईडीनं नवाब मलिकांची १४ दिवसांची कोठडी मागितली. परंतु कोर्टाने ८ दिवस ईडी कोठडी सुनावली. ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे. नवाब मलिकांना अटक केल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kambhoj) यांनी जल्लोष करत म्यानातून तलवार काढली होती. यावेळी मोहित कंबोज यांच्या घराजवळ कार्यकर्ते जमले होते. त्यानंतर आता सांताक्रुझ पोलिसांना मोहित कंबोज यांच्यावर कोविड नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

मलिक विरुद्ध कंबोज वाद

भाजपा नेते मोहित कंबोज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद नवीन नाही. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी क्रुझ ड्रग्स पार्टीवर धाड टाकल्यानंतर मलिकांनी वानखेडेंविरोधात मोर्चा उघडला होता. मलिकांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट मोहित कंबोज यांचं नाव घेऊन त्यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर कंबोज यांनी मलिकांच्या बेनामी संपत्ती आणि ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केले होते. नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्या शेरोशायरीच्या माध्यमातून ट्विटरवर वाद रंगत होते. संजय राऊत आणि नवाब मलिक म्हणजे राजकारणातील सलीम-जावेद जोडी असल्याचा टोला मोहित कंबोज यांनी लगावला होता.

मलिकांच्या अटकेनंतर कंबोज खुश

नवाब मलिकांच्या अटकेनंतर राज्यभरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मोहित कंबोज यांनी सांताक्रुझ परिसरात कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. त्यात मोहित कंबोज इतके खुश झाल्याचं पाहायला मिळालं की मलिकांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी थेट तलवार म्यानातून उपसली होती. त्यामुळे या घटनेची मुंबई पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. आता सांताक्रुझ पोलीस ठाण्यात मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :नवाब मलिकभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस