Join us

नौदलाच्या बेपत्ता जवानाचा मृतदेह ११ दिवसांनी सापडला; पोलिसांनी ५० फूटी खड्ड्यातून बाहेर काढलं अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:12 IST

नौदलाच्या जवानाचा मृतदेह रायगडच्या जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Navy Officer Missing Case: कुलाब्यातील डॉकयार्ड येथे कार्यरत असलेला नौदलातील बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सूरजसिंह अमरपालसिंह चौहान हा जवान ७ सप्टेंबरपासून अचानक गायब झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पोलीसांचे पथक सुरज यांचा शोध घेत होते. मात्र माथेरान येथील जंगलात त्यांचा मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला.

सूरजसिंह चौहान हा माथेरानजवळील भिवपुरी-गारबेट ट्रेकवर गेले होते. कुलाब्यातील डॉकयार्ड येथे कार्यरत असलेले सूरजसिंह चौहान गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते. त्यांचा फोनही लागत नव्हता. २९ मे रोजी त्यांची मुंबईच्या एफ टीटीटी विभागात नेमणूक झाली  होती. मात्र आठ दिवसांपूर्वी ते अचानक गायब झाले. त्यानंतर  शोधाशोध सुरू झाली होती. त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आले. सूरजसिंह यांचे फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपूरी रोड स्टेशन परिसरातील  दिसून आले. त्यामुळे नेरळ पोलिसांसह नौदलाकडूनही सूरजसिंह यांचा शोध सुरु होता. अखेर तपासादरम्यान पोलिसांना सूरजसिंह यांचा मृतदेह सापडला.

कर्जत आणि नेरळ दरम्यान, सातोबा मंदिर परिसरात, पाली भूतवली धरणाजवळील जंगली भागात हा मृतदेह आढळ्याच नेरळ पोलिसांनी सांगितले. मंदिराच्या मागे सुमारे ५० फूट खोलीवर असलेल्या एका खड्ड्यात हा मृतदेह आढळला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेरळ पोलिसांसह सह्याद्री रेस्क्यू टीमने हा मृतदेह बाहेर काढला. मूळ राजस्थानचे असलेले सूरजसिंह ७ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र बराच संपर्क होऊ न शकल्याने आणि त्यांचा फोन बंद लागत असल्याने नौदलाच्या अधिकाऱ्यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवला आहे. "ते घसरून पडले असावेत किंवा साप चावल्याने मृत्यू झाला असावा. पोस्टमॉर्टेमनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल," अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीसभारतीय नौदल