मुंबई : मराठी आणि हिंदी गाण्यांच्या तालावर मुंबई शहर आणि उपनगरात गरबा, रास दांडियाच्या तालावर मुंबईकर गरबा रसिक प्रेमींचे पाय थिरकू लागले आहे. मंगळवार आणि बुधवारी यामध्ये आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे बोरिवली येथील कोरा केंद्रापासून वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथील गरब्यासोबतच मुंबईत ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डिस्को जॉकीने देखील रंगत आणली आहे. मुंबई महापालिकेसोबत मुंबई पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून गरबा रसिक प्रेमी गाण्यांच्या तालावर फेर धरत असून पुढील दोन ते तीन दिवस गरब्याचा रंग आणखी बहरणार आहे.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या पाच ते सहा दिवसापर्यंत वेळेची मर्यादा असल्याने गरबा रसिकांचा हिरमोड होत होता. मात्र आता वेळेची मर्यादा वाढविण्यात आल्याने रसिकांमध्ये उत्साह आहे. पश्चिम उपनगरामध्ये बहुतांश ठिकाणी कॉर्पोरेट गरबा रंगात असून यासाठी रसिकांकडून पैसे देखील मोजले जात आहेत. तर मध्य मुंबई सारख्या मराठमोळ्या परिसरात सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून आयोजित गरब्यामध्ये मराठी आणि हिंदी गाण्यांवर रसिकांची पावले थिरकत आहेत. पूर्व उपनगरामध्ये मुलुंड पासून सायन पर्यंत विविध सोसायट्यांसोबतच सार्वजनिक नवरात्र उत्सवांमध्ये आयोजित गरब्यामध्ये हिंदी आणि गुजराती गाण्यांवर रसिकांनी फेर धरला आहे.
डिस्को जॉकी काय म्हणतो ?
गेल्या पंधरा वर्षांपासून मी डिस्को जॉकी म्हणून काम करत आहे. पंधरा वर्षांपूर्वी किंवा दहा वर्षांपूर्वी नऊ दिवस काम करण्यासाठी ४५ ते ५० हजार एवढे पैसे आकारले जात होते. मात्र आता नऊ दिवस काम करण्यासाठी किमान एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. मात्र एवढे करून देखील नफा मिळत नाही. मी वर्षभर देशभरात आणि मुंबईत वेगवेगळ्या इव्हेंटसाठी काम करतो. परंतु नवरात्रीमध्ये काम करण्यामध्ये वेगळा आनंद आणि समाधान मिळते हे विशेष आहे._ राहुल सोळंकी, डिस्को जॉकी
कुठे लागतो, किती पैसा?
गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे डिस्को जॉकी किंवा नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस वाद्यवृंद वाजवणाऱ्या किंवा संबंधित इव्हेंट कंपन्यांची संख्या देखील वाढली आहे.
काम करणाऱ्या कामगारांचा पगार देखील वाढला आहे. मुंबईत सुमारे २० हजार डिस्को जॉकी आहेत. नऊ दिवस गरबा वाजवण्यासाठी एका दिवसाचे कमीत कमी १५ हजार आणि जास्तीत जास्त एक लाख रुपये आकारले जातात.
हे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार आणि टेक्निशियन लागतात. त्यांचे वेगळे पैसे असतात. नाही म्हटलं तरी प्रत्येकाचा रोजचा रोजगार पाच ते दहा हजार असतो.
इव्हेंट किती मोठा आहे किंवा गरबा किती मोठा आहे ? त्यावर लागणाऱ्या सिस्टमसाठी कामगारांना आणि टेक्निशियनला किती पगार द्यायचा ? हे सगळे ठरते. त्यामुळे नऊ दिवसांचे गणित बांधून बजेट दिले जाते. त्या पद्धतीने नऊ दिवस इव्हेंट कंपनी किंवा डिस्को जॉकी आपले नियोजन करत असतो.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या दोन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.
Web Summary : Mumbai grooves to Garba beats! Enthusiasts dance to Marathi, Hindi, and Gujarati tunes during Navratri. DJs thrive, costs rise, and regulations ease for celebrations.
Web Summary : मुंबई गरबा की धुन पर नाचे! नवरात्रि के दौरान मराठी, हिंदी और गुजराती धुनों पर उत्साही लोगों ने नृत्य किया। डीजे का काम बढ़ा, लागत बढ़ी, और उत्सवों के लिए नियम आसान हुए।