Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या नोटिशीनंतरही नवनीत राणांचा आक्रमकपणा कायम, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:01 IST

Navneet Rana Vs Uddhav Thackeray: जामीन देतानाच्या अटींचा भंग झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केल्याने कोर्टाने राणांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मात्र त्यानंतरही राणांनी आक्रमकपणा कायम ठेवला आहे. तसेच आपल्यावरील कारवाईवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना आव्हान दिले आहे. 

नवी दिल्ली - मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या प्रकरणात कोर्टाने जामीन देताना नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्यावर काही अटी घातल्या होत्या. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर राणा दाम्पत्याने माध्यमांशी संवाद साधल्याने या अटींचा भंग झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. त्याची दखल घेत कोर्टाने राणांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. मात्र त्यानंतरही राणांनी आक्रमकपणा कायम ठेवला आहे. तसेच आपल्यावरील कारवाईवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना आव्हान दिले आहे. 

नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान म्हणाल्या की, लोकसभेच्या खासदार म्हणून सभागृहाने आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी ओम बिर्ला यांना माहिती देणार आहे. आमच्यावर अत्याचार कसा झाला याची माहिती मी त्यांना देणार आहे. तसेच आमच्यावर झालेल्या अत्याचाराची केंद्राच्या एजन्सीने चौकशी करावी, अशी मागणी करणार  आहे. कारण राज्याच्या सुरक्षा यंत्रणांकडून न्याय मिळणे कठीण आहे.

प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद आणि कोर्टाने बजावलेल्या नोटिशीबाबत नवनीत रामा म्हणाल्या की, आम्ही कोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन करत आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही कोर्टाचा आदर करू. कोर्टाने ज्याविषयी बोलण्यास मनाई केलेली आहे. तो विषय सोडून इतर सर्व मुद्द्यांवर आम्ही बोलू शकतो. त्यामुळे यापुढेही आदेशाचं पालन करत राहू. आम्ही माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय, असा दावा करण्यात आला आहे. मात्र  मला वाटतं कोर्टाने घातलेल्या कुठल्याही नियमाचा मी उल्लंघन केलेलं नाही.  मी राजकारणात आहे. त्यामुळे टीका करण्याचा माझा अधिकार आहे. त्यामुळे तो विशिष्ट्य विषय वरळून आम्ही बोलत राहू, असे राणा यांनी सांगितले. 

दरम्यान, रुग्णालयातील व्हायरल झालेले फोटो आणि एमआरआय स्कॅनच्या रिपोर्टच्या होत असलेल्या शिवसेना नेत्यांकडून मागणीवर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, मला वाटतं की, त्यांची सत्ता आहे. ते सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. ते माझ्या घरापर्यंत गेले होते. कदाचित ते उद्या लीलावती रुग्णालयाचा तोडण्याचेही आवाहन करू शकतात. त्यांचे क्रूर राजकारण रुग्णालयापर्यंत पोहोचले आहे. केवळ नवनीत राणांचे फोटो व्हायरल झाले होते, बाकीच्यांचे नाही. एमआरआय रिपोर्टबाबत म्हणाल तर कुणाचे खासगी रिपोर्ट मागण्याची गरज काय? आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे रिपोर्ट कधी मागितले का. ते दोन वर्षे आजारी होते. त्यांनी कुठली शस्त्रक्रिया करून घेतली याचे रिपोर्ट दाखवण्याची मागणी केलीय का, जर माझे रिपोर्ट पाहायचे असतील तर आधी उद्धव ठाकरेंनी आधी आपले रिपोर्ट दाखवावेत. त्यानंतर मी माझे पूर्ण रिपोर्ट देईन,  असे आव्हान नवनीत राणा यांनी दिले. 

टॅग्स :नवनीत कौर राणाउद्धव ठाकरेराजकारण