मोतीबिंदूनंतरही आता नैसर्गिक दृष्टी; स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:53 IST2025-10-15T07:53:44+5:302025-10-15T07:53:57+5:30
- संतोष हिरेमठ लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरही नैसर्गिक दृष्टी कायम राहावी, हा स्वप्नवत अनुभव प्रत्यक्षात उतरला ...

मोतीबिंदूनंतरही आता नैसर्गिक दृष्टी; स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात...
- संतोष हिरेमठ
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरही नैसर्गिक दृष्टी कायम राहावी, हा स्वप्नवत अनुभव प्रत्यक्षात उतरला आहे. छत्रपती संभाजीनगरचे डॉ. विक्रांत विनोद भाले यांच्या संशोधनातून तयार झालेल्या अनोख्या लेन्सला जागतिक पेटंट मिळाले आहे. त्यामुळे मोतीबिंदू काढल्यानंतरही रुग्णांना दिवसाबरोबरच रात्रीही जवळचे, मध्यम आणि दूरचेही स्पष्ट दिसणार आहे.
जगात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर जी कृत्रिम लेन्स बसवली जाते, ती दिवसा तोलामोलाची दृष्टी देते. मात्र, रात्री प्रकाश कमी असताना वा प्रखर प्रकाश असताना ती अपुरी पडते. लाइफलाइन मेडिकल डिव्हाइसेस प्रा.लि.चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रांत भाले यांनी ७ वर्षे संशोधन केले व नैसर्गिक दृष्टी देणारी लेन्स तयार केली.
डॉ. भाले यांना मल्टिफोकल इंट्राओक्युलर लेन्स या संशोधनासाठी सरकारकडून पेटंट मिळाले. भारतीय पेटंट कार्यालयाने पडताळणी आणि सुनावणी केल्यानंतर हे पेटंट मंजूर केले. ही लेन्स प्रोग्रेसिव्ह चष्म्याप्रमाणेच दूर, मध्यम आणि जवळ या तिन्ही अंतरावर नैसर्गिक आणि सातत्यपूर्ण दृष्टी देते.
हे लेन्स डिझाइन रिफ्रॅक्टिव्ह तंत्रज्ञानावर आधारित क्रांतिकारी नवकल्पना आहे. या लेन्समधील सूक्ष्म ऑप्टिकल झोन आपोआप प्रकाशाच्या अंतरानुसार दृष्टी समायोजित करतात. यामुळे कोणत्याही परिस्थितीत डोळ्यांना नैसर्गिक स्पष्टता मिळते. हे तंत्रज्ञान रुग्णाच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवेल. दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी तितकीच नैसर्गिक दृष्टी अनुभवण्याचे स्वप्न आता वास्तवात उतरले आहे.
- डॉ. विक्रांत विनोद भाले
या लेन्समुळे आता दूरचे आणि जवळचे पाहताना डोळ्यांवर ताण येत नाही.
- विश्वनाथ हनुमंतराव तोबरे (७०)
लेन्समुळे दूरचे ते जवळचे सहज पाहता येते. मी ४०० रुग्णांना ही लेन्स बसवली.
- डॉ. मनोज सासवडे, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ