Join us

मुंबई, ठाण्यातील जागांबाबत काँग्रेस 'प्रचंड निराशावादी'?; राष्ट्रीय नेत्यांनी दाखवला 'हात'

By यदू जोशी | Updated: April 26, 2019 12:30 IST

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा परिणाम; शेवटच्या टप्प्यात होणारा राहुल गांधी यांचा ‘रोड शो’ही रद्द

यदु जोशीमुंबई : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी मुंबई, ठाण्याच्या पट्टयातील दहा लोकसभा जागांकडे प्रचाराबाबत पाठ का दाखविली? संपूर्ण देशाच्या दृष्टीने मुंबई महत्त्वाची असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी येथे न येण्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादापायी राष्ट्रीय नेतृत्वाने मुंबईकडे दुर्लक्ष केले, असाही तर्क दिला जात आहे.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो होणार होता पण तोदेखील झाला नाही. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी देशात काही ठिकाणी सभांना संबोधित करीत आहेत. राहुल गांधी यांच्या प्रचाराचा झंझावात देशभर सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या प्रचाराचे मुख्य आधारस्तंभ असलेले हे दोन्ही नेते मुंबईत प्रचाराला आले नाहीत. प्रियंका गांधी यांनी प्रचारात स्वत:ला उत्तर प्रदेशपुरतेच यंदा मर्यादित ठेवले. मुंबई काँग्रेसमधील एकमेकांशी भांडणाऱ्या नेत्यांकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले असा त्याचा अर्थ लावला जात आहे.

राष्ट्रीय नेत्यांनी मुंबईत येऊन प्रचार केलाच पाहिजे यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा वा दिल्लीत वजन असलेल्यांनी एकतर आग्रही भूमिका घेतली नाही किंवा घेतली असेल तर त्यांचे तितके वजन पडले नाही. काँग्रेसप्रणित युपीएचे घटकपक्ष असलेल्या ओमर अब्दुल्ला, तेजस्वी यादव, सचिन पायलट अशा नव्या पिढीच्या नेत्यांना आणून मुंबईत वातावरण तयार करता आले असते पण ती संधीदेखील काँग्रेसने गमावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औसामध्ये संयुक्त सभा झाली आणि उद्या मुंबईत दोघांची समारोपाची संयुक्त सभा होत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘आदित्य संवाद’ कार्यक्रम घेतला. युतीने केले तसे शक्तीप्रदर्शन मुंबईत काँग्रेसने केले असते तर देशभर संदेश गेला असता असे राजकीय जाणकारांना वाटते. मुंबईतील प्रचार शनिवारी संपत असताना काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे शुक्रवारी प्रचार करणार असल्याचे पक्षाने सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोजक्याच सभा घेतल्या. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरातील मतदानानंतर येथे आले नाहीत. नवज्योत सिद्धू यांचा कार्यक्रम ठरला, पण ते आलेच नाहीत.

भाजपने आणले राष्ट्रीय नेतेमुंबईचे ‘कॉस्मोपॉलिटन’ स्वरुप पाहून भाजप, काँग्रेससारखे राष्ट्रीय पक्ष दर निवडणुकीला इतर राज्यांमधील नेत्यांना मुद्दाम या ठिकाणी आणून त्यांच्या प्रचारसभा घेतात. या वेळी भाजपने तसे केले पण काँग्रेसमध्ये तसे घडले नाही. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, तेथील काँग्रेसचे नेते यांनी मुंबईला येऊन प्रचार करण्याची तसदी घेतली नाही.

गेल्या महिन्यात राहुल गांधी मुंबईत आले आणि त्यांनी सभा घेतली तेव्हा तो प्रचाराचा शुभारंभच होता. मुंबईपेक्षा त्यांची गरज राजस्थानसारख्या राज्यांमध्ये अधिक होती. मुंबईत प्रचार उत्तम सुरु आहे. आनंद शर्मा, सुष्मिता देव हे नेते येऊन गेले. चिदंबरम उद्या येत आहेत. - मिलिंद देवरा, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

राहुल गांधी यांचा रोड शो व्यग्र वेळापत्रकामुळे आम्हाला मिळू शकला नाही. कमी वेळात अधिक प्रचार करता यावा म्हणून त्यांनी प्रचारसभांवर भर दिला आहे. - एकनाथ गायकवाड, काँग्रेस उमेदवार, दक्षिण-मध्य मुंबई.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९काँग्रेसराहुल गांधीनिवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019