राष्ट्रीय महिला आयोग कोण्या एका पक्षाचा असू शकत नाही - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:56 PM2020-10-21T12:56:40+5:302020-10-21T12:57:02+5:30

राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या रेखा शर्मा यांचा कार्यक्रम आणि विधानावरून मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.

The National Commission for Women cannot belong to any one party says Yashomati Thakur | राष्ट्रीय महिला आयोग कोण्या एका पक्षाचा असू शकत नाही - यशोमती ठाकूर

राष्ट्रीय महिला आयोग कोण्या एका पक्षाचा असू शकत नाही - यशोमती ठाकूर

Next

मुंबई : महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा या राजकीय अजेंडा चालवत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करण्याच्या योजनेने, हेतूनेच त्यांचा दौरा निश्चित करण्यात आला होता. राष्ट्रीय महिला आयोग कोण्या एका पक्षाचा असू शकत नाही. महिला आयोग सगळ्यांचा असतो, अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आयोगाच्या अध्यक्षा शर्मा यांना फटकारले.

राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या रेखा शर्मा यांचा कार्यक्रम आणि विधानावरून मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आपल्या नियोजित कार्यक्रम पत्रिकेत मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट ठरविली नव्हती. मात्र, ऎनवेळी सोमवारी रात्री त्यांची वेळ मागण्यात आली. तेंव्हा मंगळवारी ११ वाजताची भेटीची वेळ मंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. त्यानुसार मंत्री ठाकूर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची वाट पाहत होत्या. मात्र दुपारी बारा वाजले तरी रेखा शर्मा बैठकीसाठी आल्याच नाहीत. ऎनवेळी वेळ राखून ठेवला असताही महिला अध्यक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवली. शिवाय, कोविड सेंटरमध्ये महिलांच्या छेडाछेडीवर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विधान रेखा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. मात्र, स्वतः शर्मा यांनी कोविड सेंटरला भेट देणाच्या आपला कार्यक्रमही ऎनवेळी रद्द केला. सोमवारी दिवसभर भाजपच्या महिल्या नेत्यांच्या भेटी तर मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी भेट घेतली. 

महिला सुरक्षेच्या संदर्भात ठोस आणि वेगळा कार्यक्रम ठरवून हा दौरा व्हायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.  ठाकूर यांनी कोणतीही आकडेवारी नसताना अशा प्रकारे महाराष्ट्राबाबत बदनामीकारक विधान करण्याचे चुकीचे असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.

बदनामी करणे चुकीचे
सातत्याने महाराष्ट्र सरकार आणि येथील यंत्रणांचा अवमान होत असल्याचा आरोपही मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. रेखा शर्मा यांनी आज माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढत असल्याचा आरोप केला होता. यावरही ठाकूर यांनी कोणतीही आकडेवारी नसताना अशा प्रकारे महाराष्ट्राबाबत बदनामीकारक विधान करणे चुकीचे असल्याचे सांगितले.
 

Web Title: The National Commission for Women cannot belong to any one party says Yashomati Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.