Join us  

Narendra Modi: "आमच्यासाठी पिपल्स फर्स्ट", इंधन दरकपातीनंतर मोदींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 8:15 PM

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

मुंबई - देशातील वाढत्या महागाईवरुन केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यातच, इंधन दरवाढीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. त्यामुळे, पेट्रोल 9.5 तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या घोषणेचं पंतप्रधाननरेंद्र मोदींनी स्वागत केलं आहे. तसेच, आमच्यासाठी लोकं हेच पहिलं प्राधान्य असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.  

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तर, घरगुती गॅसच्या दराने हजारी गाठल्याने पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ आली आहे. महागाईने नागरिक त्रस्त झाला असून मोदी सरकावर मोठी टीका करण्यात येत आहे. त्यातच, केंद्र सरकारने इंधन दरकपातीचा मोठा निर्णय घेतला. तसेच, घरगुती गॅसवरही 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली. सरकारच्या या निर्णयाचं पंतप्रधाननरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे.   ''जनता हेच आमच्यासाठी प्राधान्य, आज घेण्यात आलेल्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. विशेषत: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील लक्षणीय घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल. देशातील नागरिकांना मोठा दिलासा देईल आणि त्यांच्या भावी जीवनातही फरक पडेल'', असे ट्विट मोदींनी केले आहे. तसेच, उज्ज्वला योजना ही देशातील कोट्यवधी कुटुंबीयांना मदतीची ठरली आहे, विशेषत: महिलांसाठी. गॅस सबसिडीच्या निर्णयामुळे घरातील आर्थिक बजेट कमी होण्यास मदत होईल, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

फडणवीसांकडून मोदींचं कौतुक

नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं की, ते नेहमीच सर्वसामान्यांची काळजी करतात. तसेच, सातत्याने गरिबांच्या कल्याणासाठी काम करतात. माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, राज्य सरकारनेही इंधनदरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. तसेच, निर्मला सितारमण यांनी केलेल्या घोषणेचाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरकपातीची माहिती दिली.  

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना देशातील जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. याबाबतची माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैशाने तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होतील." केंद्राच्या या निर्णयाचे भाजपमधून सर्वांनीच स्वागत केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मोदींचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी असल्याचं म्हटलं. तसेच, महाराष्ट्र सरकारनेही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करावेत, अशी मागणीही केली आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीपंतप्रधानपेट्रोलट्विटर