Join us  

Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता- देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 3:59 PM

Maharashtra Vidhan Sabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पण महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता होते, आहेत आणि कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भाजपानं गेल्या पाच वर्षांत चांगलं काम केलं आहे. मला आता कोणाचीही भीती नाही. कारण माझ्या मागे नरेंद्र मोदी आणि पक्ष उभा आहे. शिवसेना आमच्यासाठी अडचण नाही. तो आमचा मित्र आहे.मी आता सेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री आहे. भाजपा आणि शिवसेनेचं युतीचं सरकार आहे. शिवसेना हा प्रायव्हेट लिमिटेड पक्ष नाही. आदित्य ठाकरेंवर ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना शिवसेना कोणतं पद देईल, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल हे सर्वांनाच माहीत आहे, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदासंदर्भात सूचक विधान केलं आहे.मी नेहमीच महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर बोलतो, मी प्रत्येक भाषेत स्वतःच्या कामाच्या बाबतीत सांगत असतो. जे काम 15 वर्षांत झालं नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखवलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं कलम 370चा विरोध केला आहे. हा देश आमचा आहे. भाजपाच्या रक्तातच राष्ट्रवाद आहे. आम्ही काही नाही राष्ट्रासंदर्भात बोलायचं. आम्ही 370वर बोलतच राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. भाजपाच्या मोठ्या नेत्यांचं कापण्यात आलेल्या तिकिटावर ते म्हणाले, हा निर्णय भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचा आहे. ज्यांना तिकीट दिलेलं नाही, तेसुद्धा चांगलं काम करणारे नेते आहेत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 24 तारखेला मतमोजणी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019नरेंद्र मोदी