Join us
Daily Top 2Weekly Top 5

...तर चालणं, बोलणं, फिरणं किती कठीण होईल हे कळेल; नारायण राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 13:56 IST

शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल. ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं हे लक्षात ठेवा. असले प्रकार चालू देणार नाही,

मुंबई-

शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल. ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. सरकार आमचं हे लक्षात ठेवा. असले प्रकार चालू देणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे. नारायण राणे यांनी आज शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. 

अनंत चतुदर्शीनिमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत प्रभादेवीत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार हाणामारी झाली. यात आमदार सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांची उद्धव ठाकरे गटासोबत वाद झाला. यात सदा सरवणकर यांनी शिवसैनिकांना धमकावण्यासाठी त्यांच्याकडील पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्याअंतर्गत सदा सरवणकर यांच्या विरोधात पोलिसांनी आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा देखील दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आम्ही आता युतीत आहोत. त्यामुळे घटनेची माहिती घेण्यासाठी आलो होतो, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

"प्रभादेवीत घडलेल्या घटनेबाबत विचारपूस करण्यासाठी सदा सरवकरणकरांची भेट घेतली. मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारींचं मार्केटिंग सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांनाही फिरायचं आहे. परवानगी घ्यावी लागेल याचा त्यांनीही विचार करावा. ५० लोक एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी घरावर येतात मग त्यांच्यावर कोणत्या अॅक्ट अंतर्गत कारवाई करणार?", असा सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 

शिंदे गटाची ताकद काळानुसार कळेल"शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल. ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. मी सदा सरवणकरांच्या भेटीला आलो म्हणजे माजी ताकद त्यांच्या पाठीशी आहेच. तेही माझे चांगले मित्र आहेत. खरंतर आता शिल्लक राहिलेल्या सेनेला चांगले दिवस आलेत असं म्हणावं लागेल. कारण याआधी आमदार, खासदारांनाही भेटीसाठी वेळ मिळत नव्हता. आता सर्वांना भेटू लागलेत तर राहिलेल्या गाळाला चांगले दिवस आलेत असं म्हणावं लागेल", असा हल्लाबोल नारायण राणे यांनी यावेळी केला. 

टॅग्स :नारायण राणे उद्धव ठाकरे