Join us  

भगवी वस्त्रं घालून हिमालयातही जा; उद्धव ठाकरेंना नारायण राणेंच्या 'शुभेच्छा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 4:48 PM

राहुल गांधींच्या शुभेच्छांपेक्षाही माझ्या शुभेच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत, अशी कोपरखळी नारायण राणे यांनी मारली.

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचे संबंध किती सलोख्याचे आहेत, हे महाराष्ट्राला सुपरिचितच आहे. एकमेकांवर टीकेचे बाण सोडताना आपण दोघांना पाहिलंय. पण, राणेंनी आज उद्धव ठाकरेंना ५८व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्थात, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या शुभेच्छांपेक्षाही माझ्या शुभेच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत, अशी कोपरखळी त्यांनी मारली. तसंच, उद्धव यांना हिमालयात जाण्याचाही खोचक सल्लाही त्यांनी दिला. 

सकल मराठा समाजाचे आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यात आता नारायण राणे शिष्टाई करणार आहेत. मराठा समाजाने आंदोलन थांबवल्यास सरकार तातडीने आरक्षण देईल, त्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये संवाद घडवून आणू, अशी भूमिका त्यांनी आज जाहीर केली. आंदोलकांनीही तुटेपर्यंत न ताणता, सरकारवर विश्वास ठेवावा, असं आवाहनही त्यांनी केलं. 

या पत्रकार परिषदेत, एका पत्रकाराने राणेंना उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाची आठवण करून दिली. तेव्हा, तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने मी त्यांना शुभेच्छा देतो, असं राणे म्हणाले. मात्र, त्यांना टोला मारण्याची संधीही राणेंनी सोडली नाही. अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेण्याची आणि वाराणसीला गंगा आरती करण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील मॅरेथॉन मुलाखतीत बोलून दाखवली होती. तोच धागा पकडून, अयोध्या, वाराणसीच्या पुढे हिमालयही आहे, भगवी वस्त्रं घालून तिथे जायला हवं, असा टोमणा राणेंनी मारला. त्यावरून येत्या काळात राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक उडू शकते.  

टॅग्स :नारायण राणे उद्धव ठाकरेशिवसेनामराठा आरक्षण