Join us

Narayan Rane: 'दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत नाही, पण राणेंच्या बंगल्यावर दुर्बीण लावून'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:09 IST

राणे यांच्या बंगल्यात बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर पालिकेने या बंगल्याची गेल्या महिन्यात पाहणी केली होती

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेने १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांनी बंगल्यातील बेकायदा बदल हटवणे अपेक्षित आहे. अन्यथा पालिका स्वत: कारवाई करणार आहे. याप्रकरणावरुन भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगला आहे. या कारवाईमुळे राणे पुत्र संतापले असून महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. आता, आमदार आशिष शेलार यांनीही ट्विट करुन शिवसेनेला लक्ष्य केलंय. 

राणे यांच्या बंगल्यात बेकायदा बांधकामाच्या तक्रारीनंतर पालिकेने या बंगल्याची गेल्या महिन्यात पाहणी केली होती. ४ मार्च २०२२ रोजी पालिकेने राणे कुटुंबीयांना नोटीस पाठवून त्यांच्या घरातील बेकायदा बांधकामाबाबत विचारले होते. त्यावर त्यांनी बंगल्यातील बांधकाम अधिकृत असल्याचा दावा वकिलामार्फत केला होता. मात्र, पालिकेने हा दावा फेटाळून लावला आहे. त्यामुळे, भाजपचे राणे विरुद्ध शिवसेना असा वाद टोकाला आला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष्य करत महापालिकेकडून दाऊद इब्राहिमच्या अनधिकृती बांधकामावर कारवाई होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   शिवसेनेची गेल्या 25 वर्षात दाऊदच्या टेंमकर मुल्ला, पाकमोडीया स्ट्रीट, मेमनच्या अल-हुसैनी बिल्डिंग, मोहम्मद अली रोड, मालवणीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारण्याची हिम्मत नाही. पण, नारायण राणे यांच्या बंगल्यात दुर्बीण लावून शोधकार्य? सुरू आहे, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. मालाड-मालवणी समोर हार... मालवणी माणसावर प्रहार...!, असेही शेलार यांनी म्हटले आहे. 

असे आहेत बेकायदा बदल...तळघर-वाहनतळात खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. पहिला ते तिसरा मजला-उद्यानात खोली तयार करण्यात आली आहे. चौथा मजला-गच्चीवर खोलीचे बांधकाम, पाचवा मजला-गच्चीवर खोली, आठवा मजला-गच्चीवर बांधकाम, गच्ची-पॅसेज भागात बांधकाम. 

टॅग्स :मुंबईशिवसेनानारायण राणे आशीष शेलार