Join us

दिशा सालियान प्रकरणी राणे पिता-पुत्र आज पोलीस ठाण्यात; १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 05:59 IST

अटकेच्या भीतीने नारायण राणे व नीतेश राणे यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनबाबत बदनामीकारक विधाने करून दिशाभूल केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीतेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने १० मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. 

अटकेच्या भीतीने नारायण राणे व नीतेश राणे यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात ॲड. सतीश मानेशिंदे यांच्याद्वारे अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होती. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांना अटक न करण्याचे निर्देश देत विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. मुंबई पोलीस नारायण राणे व नीतेश राणे यांचा जबाब शनिवारी नोंदवणार आहे. 

या दोघांना सीआरपीसी कलम ४१(ए) अंतर्गत नोटीस बजावून जबाब नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. मालवणी पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, १९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियनच्या मृत्यूबाबत काही वक्तव्ये केली. या पत्रकार परिषदेत नीतेश राणेही उपस्थित होते.

कारवाई करण्याची मागणी

- दिशाची आई वासंती सालियनने नारायण राणे व नीतेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला. त्यापूर्वी वासंती यांनी राणे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोगाकडे केली. 

- राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या करण्याच्या सहा दिवसआधी दिशाने मालाड येथील तिच्या राहत्या उंच इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली होती.

टॅग्स :नारायण राणेनीतेश राणे