आरेच्या गतवैभवासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सहकार्य करावे - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:16 AM2020-03-02T01:16:18+5:302020-03-02T01:16:24+5:30

महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महाराष्ट्रात ठिकठिकाणी नुसती वृक्षलागवड केली नाही, तर ती जगवली आहेत.

Nanaasaheb Dharmadhikari Pratishthan should cooperate with Arya's widow - Subhash Desai | आरेच्या गतवैभवासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सहकार्य करावे - सुभाष देसाई

आरेच्या गतवैभवासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सहकार्य करावे - सुभाष देसाई

Next

मुंबई : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महाराष्ट्रात ठिकठिकाणी नुसती वृक्षलागवड केली नाही, तर ती जगवली आहेत. त्यामुळे आरेला गतवैभव प्राप्त करून, येथे वृक्षलागवड करण्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गोरेगाव येथे केले.
महापालिकेच्या गोरेगाव (पूर्व), पहाडी व्हिलेज, शर्मा इस्टेट, वालभट रोड येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा सुभाष देसाई यांच्या हस्ते रविवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ५४च्या नगरसेविका साधना माने यांच्या संकल्पनेतून येथील ५ हजार चौरसमीटर जागेत हे उद्यान उभारले आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिवशी हा सोहळा पार पडला. याप्रसंगी ठिकठिकाणावरून आलेले प्रतिष्ठानचे हजारो स्वयंसेवक उपस्थित होते.
सुभाष देसाई म्हणाले, गांडूळ खत, पाणी आडवा पाणी जिरवा, निर्माल्यातून खतनिर्मिती, कुरण व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी विविध प्रतिष्ठानच्या प्रकल्पांविषयी माहितीचा खजिना देणारे हे उद्यान आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे गोरेगावात उभारलेले मुंबईतील पहिले उद्यान असल्याचा अभिमान आहे. महाराष्ट्राला सुखी, कल्याणकारी राज्य बनविण्यासाठी प्रतिष्ठानची साथ व संगत आम्हाला मिळत आहे़ आपण सर्वांनी महाराष्ट्राला मोठे करू या. सुनील प्रभू म्हणाले, आरेतील झाडे कमी झाली आहेत. कांदिवली पूर्व रामगड येथे प्रतिष्ठानने २०१४ पासून ४५ एकर जागेत १८ हजार वृक्षलागवड करून ती जगवली आहेत.
दरम्यान, उपमहापौर सुहास वाडकर, प्रतिष्ठानचे मुंबई समन्वयक राजन कारखानीस, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू, गोरेगाव विधानसभा संघटक प्रवीण माईणकर, समन्वयक दीपक सुर्वे, उपविभागप्रमुख सुधाकर सुर्वे, उपविभागप्रमुख भाई परब, शाखाप्रमुख अजित भोगले, महिला शाखासंघटक शीला राठोड, अमोल अपराध, आश्विन माने, रवी वर्मा यावेळी उपस्थित होते.
>उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी गेल्या वर्षी ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईअर’ या वरळी येथील झालेल्या कार्यक्रमात ‘जीवन गौरव’ मिळालेल्या पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भाषणाची आणि या कार्यक्रमाची खास चित्रफीत दाखविण्यात आली.

Web Title: Nanaasaheb Dharmadhikari Pratishthan should cooperate with Arya's widow - Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.