Join us  

“लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 10:52 AM

Nana Patole News: प्रभू श्रीरामावर काँग्रेसची आस्था आहे. राम मंदिरासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात आधी प्रयत्न केले, असे नाना पटोले म्हणाले.

Nana Patole News: २०१४ नंतर देशात व राज्यात हिंदुत्ववादी व्यवस्थेने डोके वर काढले आहे. शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या भूमीत समाजात धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम सुरु आहे पण जनतेने भाजपाच्या या षडयंत्रला बळी पडू नये. काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन संघर्ष करत आहे. खोटी आश्वासने देऊन मोदी सत्तेत आले पण जनतेला आता ही चूक लक्षात आली असून २०२४ च्या निवडणुकीत जनता पुन्हा चूक करणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

 

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, प्रभू श्रीरामावर काँग्रेसची आस्था आहे, अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात आधी प्रयत्न केले. भाजपाला मात्र श्रीराम फक्त मते मागण्यासाठी हवे आहेत. कर्नाटकात त्यांनी मतांसाठी हनुमानाच्या नावाचा वापर करून पाहिला पण बजरंग बलींनी साथ दिली नाही. आताही भाजपा श्रीराम व बजरंग बलीचा वापर मतासाठी करत आहे पण श्रीराम व बजरंगबली खोटारड्या भाजपाला साथ देणार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

हिंमत असेल तर बीएमसीतील २५ वर्षांच्या कामाची एसआयटी चौकशी करा

मुंबई महानगरपालिकेतील २०१९ ते २०२२ या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी एसआयटीमार्फत करण्याचा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे. परंतु भाजपा शिवसेनेबरोबर २५ वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होता. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हिम्मत असेल तर या २५ वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. भारतीय जनता पक्ष व शिंदे सरकार हे आता विरोधकांना धमकावण्याची भाषा करत आहेत. परवाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांची तशीच भाषा होती पण त्याला आम्ही भीक घालत नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाचे हे कवच भाजपा सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने काढून घेतले

राज्यघटनेने आपल्याला आरक्षण दिले आहे पण आरक्षणाचे हे कवच भाजपा सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने काढून घेतले आहे. सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकल्या असल्याने तिथे नोकरीतील आरक्षण गेले आहे, सरकारी नोकर भरतीही केली जात नाही. यावर मात करायची असेल तर जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तरच डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा समाज घडेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील शेतकरी संकटामागून संकटाचा सामना करत आहे. अवकाळी पाऊस व गरपीटीनंतर जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही. अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे. आता पेरणीचा हंगाम सुरु झाला आहे पण शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत राज्य सरकारने शेतकऱ्याला बियाणे, खते मोफत द्यावीत व पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

 

 

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेस