Join us  

“राहुल गांधी सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडतायत, BJP ला थेट आव्हान देणारे देशातील एकमेव नेते”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 5:20 PM

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भाजपला तोंड देण्यास समर्थ आहे, असे नाना पटोले म्हणाले.

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी अनेक नेतेमंडळींच्या ममता दीदींनी भेटीगाठी घेतल्या. मात्र, यानंतर आता महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता काँग्रेस पक्ष व राहुल गांधी गेल्या ७ वर्षापासून केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रान पेटवून सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत. भाजपासारख्या विभाजनवादी शक्तीविरोधीत एकत्रित लढा देणे ही काळाची गरज असताना काही लोक भाजपाला मदत होईल अशी भूमिका घेत आहेत. २०१९ च्या निवडणुकीतही असाच प्रयत्न केला गेला ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच झाला होता, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी  केली आहे.  

मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात देश, लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. सीबीआय, ईडी, आयकर सारख्या सर्व सरकारी यंत्रणांची भीती विरोधीपक्षांना दाखवली जात आहे परंतु काँग्रेस अशा कोणत्याच दडपशाहीला भीक घालत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.  

काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन केंद्र सरकार विरोधात लढतोय

राहुल गांधी, प्रियंका गांधी या सातत्याने केंद्र सरकारच्या अत्याचाराविरोधात आक्रमपणे लढा देत आहेत. शेतकरी, कामगार, दलित, पीडित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. काही राजकीय पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या भितीने भाजपविरोधात बोटचेपी भूमिका घेत आहेत. काँग्रेस पक्ष मात्र रस्त्यावर उतरुन केंद्र सरकार विरोधात लढत आहे. अहंकारी सत्तेलाही सामान्य जनतेच्या शक्तीसमोर हार मानावी लागते हे शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे रद्द करावे लागले, असे नाना पटोले यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस भाजपला तोंड देण्यास समर्थ

महागाई, शेतकरी, कामगारांचे व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे व यापुढेही तो सुरुच राहिल.  जनतेचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे व हा विश्वास दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. काँग्रेस पक्षाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. काँग्रेस पक्ष भाजपाच्या विरोधात ठाम उभा तसेच इतर पक्षही कोणाबरोबर आहेत हे देशातील जनतेला माहिती झाले पाहिजे. काँग्रेसला वगळून अनेक आघाड्या करण्याचे प्रयत्न केले गेले त्याचा फायदा कोणाला होतो हेही कळले असून सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली  काँग्रेस पक्ष यापुढेही भाजपाला तोंड देण्यास समर्थ आहे असेही प्रांताध्यक्ष म्हणाले. 

टॅग्स :नाना पटोलेराहुल गांधीकाँग्रेस