Join us  

“भाजपविरोधी लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढली पाहिजे; काँग्रेस हाच सक्षम पर्याय”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 6:02 PM

वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, एका राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही, असा टोला नाना पटोलेंनी लगावला.

मुंबई: भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पाहात आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही, तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत, असे पटोले म्हणाले. 

राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात लढले

राहुल गांधी हेच केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपविरोधात ठामपणे उभे राहिले. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देशात भाजपला पराभूत करायचे असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करणे सहज शक्य आहे. तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.  

टॅग्स :नाना पटोलेममता बॅनर्जीभाजपामुंबई