गुजरातच्या मतदार यादीत मिरा-भाईंदरमधील भाजप माजी नगरसेवक आणि कुटुंबीयांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:47 IST2025-11-08T11:47:06+5:302025-11-08T11:47:39+5:30
दोन विधानसभा मतदारसंघांसह गुजरात, उत्तर प्रदेशमधील मतदार यादीत नावे

गुजरातच्या मतदार यादीत मिरा-भाईंदरमधील भाजप माजी नगरसेवक आणि कुटुंबीयांची नावे
लोकमत न्यूज नेटवर्क, मिरा रोड: मिरा-भाईंदरमध्ये राहणाऱ्या भाजपच्या तीन माजी नगरसेवक व कुटुंबीयांची नावे शहरातील दोन विधानसभा मतदारसंघांसह त्यांच्या गुजरात, उत्तर प्रदेशमधील मतदार यादीत असून गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली. भाईंदर पूर्व भागात राहणारे भाजपचे माजी नगरसेवक मदन सिंह व पत्नी रिटा यांचे मिरा-भाईंदर १४५ विधानसभा आणि १४६ ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत दोन्ही ठिकाणी नावे आहेत. याशिवाय त्यांच्या जाफराबाद मतदारसंघाच्या मतदार यादीतही नावे आहेत. भाजपचे प्रवक्ता शैलेश पांडे यांचे मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात आणि उत्तर प्रदेश येथील गावातील यादीत नाव आहे.
मिरा रोड येथील भाजपचे माजी नगरसेवक अनिल विराणी, त्यांची माजी नगरसेविका पत्नी रेखा यांची मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात दोन वेळा नावे आहेतच शिवाय त्यांची गुजरात येथील गावच्या मतदार यादीतही नावे आहेत. विराणी यांच्या आई-वडील, भाऊ आदींचीदेखील मिरा-भाईंदरसह गुजरातमधील मतदार यादीत नावे आहेत. भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहतासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच ७११ कंपनीच्या संचालक आदींची ते ओवळा माजिवडा मतदारसंघात राहत असताना व तेथे मतदार यादीत नाव असताना विधानसभा निवडणुकीत मतांसाठी मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात नावे नोंदवून मतदान केल्याप्रकरणी काँग्रेसने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे म्हणणे काय?
बोगस मतदार नोंदणी करून मतदान करणे, अनेक ठिकाणी नावे असणे, मतदार यादीतील अपूर्ण माहिती, त्रुटी, दुबार नावे, मृतांची नावे, जागेवर राहत नसलेल्यांची नावे मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने नोंदवली गेली आहेत. कटकारस्थान करून खोट्या माहितीच्या आधारे मते मिळवायची असा हा प्रकार आल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सांगितले.