Join us

‘त्या’ यादीतून शहीद व मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीतून प्रकार घडल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 04:54 IST

अशोक कामटे, रॉय यांच्या मालमत्तेची माहिती मागविणार नाही

मुंबई : ‘२६/११’तील हुतात्मा आयपीएस अशोक कामटे यांच्यासह दिवंगत अधिकारी हिमांशू रॉय, आर. के. सहाय आदींकडून मालमत्तेबाबत माहिती मागविण्याबाबत चूक झाल्याची कबुली राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिली आहे. संबंधित प्रकार नजर चुकीने घडला असून, त्यांची नावे तातडीने हटविली असून, संबंधितांच्या कुटुंबीयांना त्रास देण्याचा कसलाही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्टÑ पोलीस दलात कार्यरत असलेल्या ज्या आयपीएस अधिकाऱ्यांनी २०१८ या वर्षात त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेबाबत माहिती कळविली नव्हती, त्यांना त्याबाबत तातडीने माहिती कळविण्याची सूचना केंद्रीय गृहविभागाकडून करण्यात आलेली होती. त्या यादीमध्ये २६/११ तील शहीद व अन्य मृत अधिकाºयांचा समावेश होता. ‘लोकमत’ने हा गृहविभाग व पोलीस मुख्यालयाचाहा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर, खडबडून जागे झालेल्या महासंचालक कार्यालयाने संबंधित यादीच संकेतस्थळावरून तातडीने हटविली. तसेच दिवगंत अधिकाºयांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.केंद्राने पाठविलेल्या १४ जणांच्या यादीमध्ये शहीद अशोक कामटे, दिवंगत आर. के. सहाय, हिमांशू रॉय, आनंद मंड्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व्ही. एस. लक्ष्मीनारायण, बडतर्फ मारिया फर्नांडिस, निवृत्त अप्पर महासंचालक भगवंत मोरे यांचा समावेश होता. गृहविभागाने या यादीची शहानिशा न करता कार्यवाहीस ती पोलीस मुख्यालयाकडे पाठविली. संबंधित अधिकाºयांनी ती निटपणे न पाहता, संबंधितांना स्थावर मालमत्तेची माहिती पाठविण्याबाबत कळविले होती. तसेच ही यादी पोलीस दलाच्या संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आली होती.शहीद अशोक कामटे व दिवंगत अधिकाºयांबद्दल आपल्या सर्वांना नितांत आदर आहे. शहीद व मृत अधिकाºयांची नावे नजरचुकीने राहिली होती. त्यामध्ये कुटुंबीयांना दुखाविण्याचा कसलाही हेतू नाही. ही यादी तातडीने हटविण्यात आली असून, अद्ययावत सुधारित माहिती केंद्राकडे पाठविली जाईल. - सुबोध जायसवाल, पोलीस महासंचालक

 

टॅग्स :पोलिस