शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 07:25 IST2024-12-05T07:22:15+5:302024-12-05T07:25:02+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आणि ठेकेदार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जावर न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठापुढे सुनावणी घेण्यात आली.

शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांची नावे द्या; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यापूर्वी पुतळ्याची पाहणी कोणत्या नौदल अधिकाऱ्यांनी केली होती, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ९ डिसेंबरला अधिकाऱ्याची नावे सादर करण्याचे निर्देश दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आणि ठेकेदार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जावर न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठापुढे सुनावणी घेण्यात आली. नौदलाने पुतळा घडवायला सांगितला होता, त्याप्रमाणे जयदीप यांनी तो घडवला. समुद्रकिनाऱ्यावर कसा पुतळा असावा, याचा शास्त्रीय अभ्यास केला नाही. घर गहाण टाकून आणि आई-वडिलांकडून पैसे घेऊन ४० लाख रुपये उभे केले. पुतळा बनल्यानंतर तो नौदलाकडे सुपुर्द केला. त्यांनी पाहणी केल्यानंतर पैसे देण्यात आले. जयदीप यांनी नौदलाने सांगितल्याप्रमाणे पुतळा घडवला. या गुन्ह्यात त्यांना नाहक गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद जयदीप यांचे वकील गणेश सोवनी यांनी न्यायालयात केला.
नौदल अधिकाऱ्यांना आरोपी का केले नाही?
पुतळ्याची पाहणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केली, त्यांना का आरोपी करण्यात आले नाही? असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने सरकारी वकिलांना संबंधित नौदल अधिकाऱ्यांची नावे सादर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले.