Join us

नागपूरचा वाघ मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 15:40 IST

Nagpur tiger arrives in Mumbai : नियमाप्रमाणे विलगीकरण 

मुंबई : नागपूर येथील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात ठेवण्यात आलेल्या आरटी १ या अंदाजे ७ वर्षीय नर वाघाला शनिवारी सकाळी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले. चंद्रपूर जिल्हयातील राजुरा वन क्षेत्रात त्याला बंदिस्त करण्यात आले होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, नर वाघाला येथे आणण्याची परवानगी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिली होती. त्याप्रमाणे उद्यानातील एका पथकाने सर्व काळजी घेऊन तसेच नियमांचे पालन करून या वाघाला शनिवारी पहाटे मुंबईत आणले. तीन दिवसांच्या प्रवासात वाघाची काळजी घेण्यात आली. त्याला वेळोवेळी अन्न व पाणी देण्यात आले. प्रवासाचा ताण होणार नाही या दृष्टीने वेळोवेळी आराम देण्यात आला. वाघाच्या सुरक्षित प्रवासाची जबाबादारी उद्यानातील वन्य प्राणी बचाव पथकाने पार पाडली.

सद्यस्थितीमध्ये वाघाची तपासणी करण्यात आली आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे त्याला विलगीकरण ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे पुढील व्यवस्थापन करण्यात येईल. त्याची सर्व काळजी घेण्यात येत आहे. 

टॅग्स :वाघमुंबईपर्यावरणवनविभाग