Join us  

नागपुरात संसदीय प्रशिक्षण संस्था हवी, नाना पटोलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 1:53 AM

‘लोकमत’ने उचलला होता मुद्दा

मुंबई : नागपूरच्या विधानभवनात राष्ट्रीय संसदीय प्रशिक्षण संस्था उभारावी या लोकमतने उपस्थित केलेल्या मुद्याची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा सचिवालयाला तशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे. तसेच देशभरातील पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत पटोले ही मागणी करणार आहेत.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. महामानवाच्या या भूमीत संसदीय कायदे, नियमांचे प्रशिक्षण देणारी संस्था उभी राहावी, अशी भूमिका लोकमतने मांडली होती. पटोेले यांनी या मुद्याची दखल घेत लोकसभा सचिवालयाचे सहसचिव डॉ. अजय कुमार यांना पत्र लिहिले. गुजरातमधील केवडिया येथे २५ आणि २६ नोव्हेंबरला पीठासीन अधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेच्या अजेंड्यावर नागपुरात सदर संस्था उभारण्याचा मुद्दा समाविष्ट करावा, अशी मागणी पटोेले यांनी केली आहे.

लोकसभा सचिवालयात ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडी ॲण्ड ट्रेनिंग ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. त्याचे केंद्र नागपूर येथे सुरू करावे, अशी मागणी पटोले या परिषदेत लोकसभा अध्यक्षांकडे करणार आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे विधानभवनाची भव्य वास्तू आहे. तसेच रविभवन, नागभवन, आमदार निवासात निवासाची उत्तम व्यवस्थाही आहे. देश-विदेशातील संसदीय लोकशाहीचे अभ्यासक या ठिकाणी मार्गदर्शन, अध्यापन करण्यासाठी येऊ शकतात.

नागपुरात संसदीय प्रशिक्षण संस्था उभी राहिली तर संसदीय कायदे, नियमांचा आणि कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी देशभरातील राजकीय कार्यकर्ते, अधिकारी, विद्यार्थी येतील. लोकमतने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत मी लोकसभा सचिवालयास लिहिले आहे.- नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

टॅग्स :नागपूरनाना पटोले