मुंबई : कोरोनाच्या महामारीत पोलीस जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत असताना अशाच एका कर्तव्यदक्ष उपनिरीक्षक तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधान व माणुसकीमुळे एका निराधार मतिमंद महिलेचे व तिच्या नवजात बालकाचे प्राण वाचले. मुसळधार पावसात पहाटेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी महिला प्रसूत झाल्यानंतर तिची काळजी घेत डॉक्टरांना पाचारण करीत सुखरूपपणे रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत व उपचार झाल्यामुळे बाळ व बाळंतीण बचावले. भर पावसात तीन-चार तास भिजत राहून खाकी वर्दीने माणुसकीची ही ‘नाळ’ जपली. त्यांनी दाखविलेल्या औदार्याबद्दल पोलीस वर्तूळ व सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.आझाद मैदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी पहाटे हे अमूल्य कर्तव्य बजाविले. ४ जुलैला मुसळधार पाऊस सुरू असताना प्रिया गरुड यांनी मध्यरात्री तीन वाजेपर्यंत आझाद मैदान मोबाइल क्रमांक -१ वाहनावरून नाकाबंदीची ड्युटी केली. त्या पोलीस ठाण्यात पोहोचल्या असताना चारच्या सुमारास त्यांना मोबाइलवर फोन करून एकाने मेट्रो सिनेमाजवळ एक महिला रस्त्यावर ओरडत पडली असल्याचे सांगितले. त्यांनी चालतच तेथे जाऊन पहिले असता ३५ वर्षांची एक महिला फुटपाथवर झोपली असून प्रसूतीच्या कळांमुळे विव्हळत होती. कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोणी तिच्या जवळ जातही नव्हते. तिच्या अंगावर कपडेही नव्हते, ते पाहून त्यांच्यासमवेत आलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने परिसरातील घरात जाऊन चादर व अन्य कपडे आणले. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ती मतिमंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी कामा रुग्णालयात जाऊन तेथील निवासी डॉक्टरांना हा प्रकार सांगितला. मात्र त्यांनी हॉस्पिटल सोडून सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे त्या परत महिलेजवळ गेल्या. तेव्हा तिची प्रसूती झाली होती. मात्र नाळ तोडण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महिलेला त्रास होऊन ती किंचाळत होती. नियंत्रण कक्ष व रुग्णालयात फोन करून अॅम्ब्युलन्स मागविली. मात्र उपलब्ध नसल्याने ती वेळेत आली नाही. त्यामुळे तेथेच थांबून शक्य तितकी मदत करीत राहिल्या. पावसाचा जोर कायमच होता. त्यातच तीन ते चार घुशी त्या महिलेला त्रास देत असल्याने त्यांना हुसकावून लावत होत्या. डॉक्टर येत नसल्याने ज्या वृद्ध महिलेने फोन केला होता तिलाच बोलावून तिला मदत करू लागल्या. दरम्यानच्या काळात एक अॅम्ब्युलन्स आली मात्र त्यात डॉक्टर नव्हते. अखेर सातच्या सुमारास प्रभादेवी मंदिर येथून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आली. त्यातील डॉक्टरानी पीपीई किट घालत बाळाची नाळ कापली. दोघांना घेऊन रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार केले. दोघी सुखरूप असल्याचे समजल्यानंतर गरुड व त्याच्या सहकाºयांना हायसे वाटले. रात्रभर जागल्याचा शीणवटा निघून गेला.चारच्या सुमारास त्यांना मोबाइलवर फोन करून एकाने मेट्रो सिनेमाजवळ एक महिला रस्त्यावर ओरडत पडली असल्याचे सांगितले. त्यांनी चालतच तेथे जाऊन पहिले असता ३५ वर्षांची एक महिला फुटपाथवर झोपली असून प्रसूतीच्या कळांमुळे विव्हळत होती. कोरोनाच्या परिस्थितीमुळे कोणी तिच्या जवळ जातही नव्हते. तिच्या अंगावर कपडेही नव्हते. ते पाहून त्यांनी कपडेही आणले.
खाकी वर्दीने जपली माणुसकीशी ‘नाळ’!, बाळबाळंतीण सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 03:09 IST