Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाऊनलोड करण्यात तपास संस्थेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 05:13 IST

सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत व प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहनही तपास संस्थेने केले आहे.

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत झालेल्या विमान अपघाताची चौकशी विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) सुरू केली आहे. अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आल्याचे तपास संस्थेने स्पष्ट केले आहे.

सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत व प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहनही तपास संस्थेने केले आहे.

बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या लिअरजेट ४५ (व्हीटी-एसएसके) विमान अपघाताची एएआयबीमार्फत चौकशी सुरू असून, ही चौकशी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनाच्या मानके व शिफारस केलेल्या पद्धतीनुसार काटेकोरपणे केली जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. मात्र, अपघाताच्या वेळी दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्याने आगीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. विमानातील डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर एएआयबीच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला आहे. त्यामुळे अपघाताच्या आधीची उड्डाणातील तांत्रिक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, तर हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची सखोल तपासणी सुरू आहे. डेटा पुनर्प्राप्तीसाठी संस्थेने अमेरिकेकडे विशेष सहाय्य मागितले आहे.

हनीवेल या कंपनीने बनविलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरमधील (सीव्हीआर) माहिती पुन्हा मिळविण्यासाठी हे उपकरण बनविणाऱ्या अमेरिकेकडे साहाय्य मागण्यात आले आहे, असे एएआयबीने मंगळवारी सांगितले.

ही चौकशी समावेशक, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित व्हावी, यासाठी सर्व विहीत तांत्रिक व प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे पालन केले जात असल्याचे संस्थेने नमूद केले. तसेच संपूर्ण पारदर्शकतेची हमी देत, योग्य वेळी पुढील माहिती जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

अपघाताची सीबीआय चौकशी करा, सुनेत्रा पवार  यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत बुधवारी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे अजित पवार

गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's plane crash mystery to unravel: Data recorder success

Web Summary : The investigation into Ajit Pawar's plane crash progresses as the flight data recorder is successfully downloaded. The Air Accident Investigation Bureau is thoroughly examining the cause, seeking US help for voice recorder analysis. A CBI probe has been requested.
टॅग्स :अजित पवारविमान दुर्घटना