शिवसेनेमुळे घडून आली माय लेकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 19:34 IST2020-06-29T19:33:52+5:302020-06-29T19:34:09+5:30
- मनोहर कुंभेजकर मुंबई : अंधेरी (पूर्व) मालपा डोंगरी येथील वैभव जोशी आज पहाटे 3 वाजता अंधेरी पूर्व येथील ...

शिवसेनेमुळे घडून आली माय लेकाची भेट
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : अंधेरी (पूर्व) मालपा डोंगरी येथील वैभव जोशी आज पहाटे 3 वाजता अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कतार वरून सुखरूप परत आला आणि त्याच्या आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.
वैभव नोकरी निमित्त परदेशात गेला होता पण कोरोनामुळे तो कतारला अडकला होता आणि त्याची तब्येत ही बिघडली होती. त्याची आई माधुरी मुंबईत खूप चिंतेत होती आणि मुलाला भेटण्यासाठी ती व्याकुळ झाली होती. माझं बाळ मुंबईत सुखरूप मला आणून द्या असे साकडे वैभवच्या आईने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले होते.
वैभवला कतार वरून मुंबईत आणण्यासाठी शिवसेनेचे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उपविभागप्रमुख जितेंद्र जानावळे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे,केंद्रीय परराष्ट्र मंत्री तसेच कतार येथील भारतीय दूतावासाशी व वैभव काम करत असलेल्या कतार येथील कंपनीच्या व्यवस्थापनाशी त्याला मुंबईत लवकर आणण्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आज वैभव सुखरूप मुंबईत परत आला.
एक शिवसैनिक म्हणून माणुसकीने मी सतत प्रयत्न करत होतो आणि त्यात मला यश मिळाले. वैभव आज पहाटे कतार वरून मुंबईला आला आणि शिवसेनेमुळे माय लेकाची भेट घडून आली अशी माहिती जानावळे यांनी लोकमतला दिली.
वैभव विमानतळावरून बाहेर आल्यावर त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. पदराने डोळे पुसताना त्या मातेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जानावळे यांना धन्यवाद दिले. शिवसेनेचे उपकार आपण जन्मभर विसरणार नाही असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.