मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात मुस्लीम समुदायासोबत बैठक घेतली. या बैठकीत केरळ आणि पंजाबच्या धर्तीवर सीएएविरोधात राज्य विधानसभेत ठराव आणण्याची मागणी केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिष्टमंडळाला कुठल्याही स्वरूपाचे आश्वासन दिलेले नाही.मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. या वेळी ठाकरे यांनी सुरुवातीला पोलीस नियंत्रण कक्षाची पाहणी करत, मुस्लीम समुदायासोबत संवाद साधला. या वेळी विविध मुस्लीम समुदाय संघटनांतील १५० ते २०० जण उपस्थित होते. रझा अॅकॅडमीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून सीएए आणि नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन (एनआरसी) विरोधात ठराव आणण्याची मागणी केली. मात्र याबाबत कुठलेही आश्वासन ठाकरे यांनी दिले नाही. या बैठकीला पोलीस आयुक्त संजय बर्वे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तसेच मुंबईत सीएएविरोधात निषेध वर्तविताना कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत शांतता राखण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबई ही आपली सर्वांची आहे. प्रत्येक मुस्लीम बांधव हा आपल्या घरातच आहे. आपल्या घरात कोणालाही भीती बाळगण्याचे कारण नाही़ आपण सर्व सुरक्षित आहात याचा विश्वास बाळगा़
मुंबईत मुस्लीम बांधव सुरक्षित - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 02:57 IST