कबुतर पकडायला नेतो सांगून हत्या! काकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 05:11 IST2017-11-30T05:11:23+5:302017-11-30T05:11:35+5:30
अनैसर्गिक संभोगाला विरोध केल्याने ऋषी वाघेला (११) या मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने बुधवारी या प्रकरणी काका रवी वाघेलाच्या मुसक्या आवळल्या.

कबुतर पकडायला नेतो सांगून हत्या! काकाला अटक
मुंबई : अनैसर्गिक संभोगाला विरोध केल्याने ऋषी वाघेला (११) या मुलाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने बुधवारी या प्रकरणी काका रवी वाघेलाच्या मुसक्या आवळल्या.
रवी वाघेला हा ऋषीचा काका असून, भंगार वेचण्याचे काम करतो. ऋषी हा राहत्या घरातून २२ नोव्हेंबरला गायब झाला. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह वर्सोवा परिसरात आढळला. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई, आशा कोरके, अरुण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक शरद धराडे, वाल्मीकी कोरे आणि पथक तपास करत होते.
तपासाअंती त्यांना रवी हा एका दुसºया मुलाला संभोगासाठी घेऊन गेल्याचे समजले. तसेच बुधवारी पूर्ण दिवस तो घरी नव्हता. त्यामुळे संशयावरून त्याला ताब्यात घेत देसाई यांच्या पथकाने चौकशी केली असता त्याने ऋषीच्या हत्येची कबुली दिली. पुढील चौकशीसाठी त्याला जुहू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
खाडीजवळ गळा दाबून घेतला जीव
ऋषीला कबुतर फार आवडायचे, हे रवीला माहीत होते. २२ नोव्हेंबरला तो ऋषीला कबुतर पकडण्यासाठी घेऊन गेला. ऋषी काकासोबत गेला. वर्सोव्याच्या कवटी खाडीजवळ गेल्यावर रवीने ऋषीवर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यादरम्यान त्याने विरोध केला. तेव्हा त्या रागात रवीने त्याला गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून तो पसार झाला. या खाडी परिसरातच रवी कचरा वेचण्याचे काम करायचा.