पालिकेचे ‘मिशन इलेक्शन’, मतदारांना अधिकाधिक सेवा देण्यावर भर, मतदान केंद्रे, मतमोजणीपर्यंतच्या तयारीला सुरुवात
By सीमा महांगडे | Updated: November 13, 2025 13:56 IST2025-11-13T13:55:29+5:302025-11-13T13:56:10+5:30
BMC Election: महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्याचप्रमाणे पालिका प्रशासनही निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागले आहे.

पालिकेचे ‘मिशन इलेक्शन’, मतदारांना अधिकाधिक सेवा देण्यावर भर, मतदान केंद्रे, मतमोजणीपर्यंतच्या तयारीला सुरुवात
- सीमा महांगडे
मुंबई - महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्याचप्रमाणे पालिका प्रशासनही निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागले आहे. मतदान आणि मतमोजणी केंद्रे तसेच मतदारांसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारण्यासाठी पालिकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्व सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे.
विधानसभा निवडणुकीवेळी महापालिकेने चांगल्या सुविधा मतदारांना उपलब्ध करून दिल्याने सर्व स्तरांतून पालिकेचे कौतुक झाले होते. पालिका निवडणुकीसाठीही मतदारांना उत्तम सुविधा देणे तसेच, मतदान करणे सोपे व्हावे, यासाठी काही ठिकाणी मोकळ्या जागांवर, तर काही ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारली जाणार आहेत. इतर सुविधांसाठी पालिका कंत्राटदाराची निवड करणार आहे. मतदान केंद्रे उभारणीपासून ते मतमोजणीपर्यंतच्या सुविधांचा त्यात समावेश आहे. यासाठी मुंबईतील २४ वॉर्डांच्या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी सखी बूथ
महिला मतदारांसाठी खास ‘सखी बूथ’ उभारले जाणार आहेत. या बूथची सजावट गुलाबी पडदे, फुले, फुगे आणि सेल्फी पॉइंटसह केली जाणार आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागात वैद्यकीय बूथ उभारण्यात येणार असून, तेथे मतदानाच्या एक दिवस आधीपासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सेवा उपलब्ध असेल.
मतदारांना सुविधा अशा...
मंडप उभारणी, विजेची सोय, फर्निचर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शिवाय मतमोजणीच्या वेळी विशेष बैठक व्यवस्थेसाठी आवश्यक सुविधा
अग्निशमन सेवेत फायर एक्स्टिंग्विशरसोबतच बॅरिकेटिंग केले जाणार आहे.
दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा अनिवार्य करण्यात येणार आहे.
२४ वॉर्ड मधील अधिकाधिक नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.