तुमच्या घरातील घातक कचरा आता पिवळ्या पेट्यांमध्येच टाका! सॅनिटरी पॅड, डायपरच्या संकलनावर भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:10 IST2025-08-16T12:09:50+5:302025-08-16T12:10:00+5:30
संस्थांना सोमवारपासून पेट्यांचे वितरण

तुमच्या घरातील घातक कचरा आता पिवळ्या पेट्यांमध्येच टाका! सॅनिटरी पॅड, डायपरच्या संकलनावर भर
मुंबई : सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधे आदी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छताविषयक बाबींची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता 'घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचे संकलन' महापालिकेच्या घनकचरा विभागाने सुरू केले आहे. हा कचरा एकत्रित जमा करण्यासाठी नोंदणी करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्युटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था अशा आस्थापनांना पालिकेकडून सोमवारपासून पिवळ्या कचरापेट्या दिल्या जाणार आहेत.
मुंबईमध्ये सध्या रोज सुमारे ७ ते ८ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्यतः हा कचरा घरगुती कचऱ्यामध्ये टाकला जातो. त्यामुळे, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. शिवाय अशा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्रास होतो. ही प्रक्रिया सोपी व्हावी, यासाठी पालिकेने घातक कचऱ्याचे संकलन सुरू केले आहे.
या सेवेसाठी पालिकेच्या संकेतस्थळावरील लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्सअॅप तसेच अन्य माध्यमातून क्यूआर कोड पाठविण्यात येत असून, तो स्कॅन करूनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
कापूस, इंजेक्शन सुई, ब्लेड्स, पीपीईचा समावेश
घरगुती घातक कचऱ्यात प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस (जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले), कालबाह्य औषधी (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि ब्युटी पार्लर निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो.
२०२ टन कचरा संकलित
मे महिन्यापासून सुरू झालेल्या या सेवेत आतापर्यंत तीन हजार ५३६ आस्थापनांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये दोन हजार २१ गृहनिर्माण संस्था, एक हजार १४६ ब्युटी पार्लर, २८६ शैक्षणिक संस्था, ४० महिला वसतिगृह यांचा समावेश आहे. या सर्व आस्थापनांकडून आतापर्यंत सुमारे २०२ टन घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलित करण्यात आला आहे.