मुंबई : कबुतरखान्यांवरील बंदीचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सोमवारी मुंबई महापालिकेने कारवाई आणखी तीव्र केली. महापालिकेने १ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकल्याबद्दल एक लाख ३२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सर्वांत प्रभावी कारवाई दादर कबुतरखाना परिसरात करण्यात आली. या परिसरात २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानेही कारवाई थांबवण्यास नकार दिल्याने पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कबुतरखान्यांवर टाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
दादरप्रमाणे गेटवे ऑफ इंडिया आणि जीपीओ परिसरात मोठे कबुतरखाने आहेत. या भागातून १२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली असली तरी अजूनही खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे पालिका कारवाईची तीव्रता वाढवणार आहे.