Municipal students' trip to Essel World | महापालिका विद्यार्थ्यांची सहल एस्सेल वर्ल्डला; शैक्षणिक सहलींच्या उद्देशालाच हरताळ!
महापालिका विद्यार्थ्यांची सहल एस्सेल वर्ल्डला; शैक्षणिक सहलींच्या उद्देशालाच हरताळ!

मुंबई : मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल यंदा बोरीवलीच्या एस्सेल वर्ल्डमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही शैक्षणिक सहल असल्यास एस्सेल वर्ल्डसारख्या रिसॉर्टच्या ठिकाणी नेमके शैक्षणिक काय, असा सवाल मुख्याध्यापक संघटनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

डिसेंबर-जानेवारी महिन्यात शाळाशाळांतून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात, माहितीत भर टाकणाऱ्या शैक्षणिक सहलींऐवजी एखाद्या रिसॉर्ट अथवा तत्सम मनोरंजन पार्कात सहली नेण्याकडे शाळांचा कल वाढू लागला आहे. विशेष म्हणजे खाजगी शाळांसह पालिका शाळाही याला प्रोत्साहन देत असून मुंबई महापालिकेने मागच्या वेळेप्रमाणे यंदाही रिसॉर्ट सहलींकडे आपला मोर्चा वळविला आहे. सहलीसाठी शिक्षण विभागाकडे सहा ते सात संस्थांनी अर्ज केले होते. त्यामध्ये कमी दरात एस्सेल वर्ल्डने बोली लावल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव शिक्षण समितीला सादर करण्यात आलेला आहे, अशी माहिती मिळाली आहे. मात्र हे करताना अशा सहलींतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा नेमका काय, असा सवाल शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.

शाळाही रिसॉर्ट अथवा मनोरंजन पार्कातील सहलींचा सहज उपलब्ध होणारा पर्याय निवडतात. या एकसुरी अनुभवामुळे विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व बंदिस्त होऊन जाते. असे विद्यार्थी ‘माझा अविस्मरणीय प्रवास’ या विषयावर निबंध लिहितील ही अपेक्षाच करणे चूक ठरते, असे मत एका पालिका शिक्षकानेच नाव न सांगण्याच्या अटीवर 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

६१ हजार विद्यार्थी जाणार
इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एस्सेल वर्ल्ड येथे सहल काढण्यात येणार असून, २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ती आयोजित करण्यात येणार आहे. दोन्ही इयत्तेचे एकूण ६१ हजार विद्यार्थी असणार आहेत.

Web Title: Municipal students' trip to Essel World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.