Join us  

मुंबईच्या वाइल्ड लाइफवर महापालिकेचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 2:36 AM

राज्यात आढळणारी जैवविविधता मुंबईतही आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे़ मुंबईचे वाइल्ड लाइफ जगासमोर आणण्यासाठी महापालिका चित्रपट तयार करणार आहे.

मुंबई : राज्यात आढळणारी जैवविविधता मुंबईतही आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे़ मुंबईचे वाइल्ड लाइफ जगासमोर आणण्यासाठी महापालिका चित्रपट तयार करणार आहे. कर्नाटक वाइल्ड हा जगप्रसिद्ध चित्रपट बनविणारे अमोघ वर्षा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचा टीझर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला.मुंबईत आतापर्यंत फक्त चटई क्षेत्र याकडे लक्ष दिले गेले. या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य जगासमोर येणार आहे. प्रवीण परदेशी यांच्या रूपाने जंगलाची आवड असणारा आयुक्त मुंबई महापालिकेला मिळाला असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. अजय देवगण यांच्या ‘तानाजी’ चित्रपटाचा शो दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात मंगळवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अ‍ॅड. सुहास वाडकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राहुल नार्वेकर, अभिनेत्री दिया मिर्झा, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सहायक आयुक्त किरण दिघावकर उपस्थित होते.भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात निसर्ग परिचय केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. यामध्ये मुंबईची जैवविविधता आणि संस्कृतीचे दर्शनही घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईवन्यजीवसिनेमा