पालिका कर्मचारी अनुदानात चार वर्षांत १३ हजारांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:40 IST2025-10-06T10:39:37+5:302025-10-06T10:40:17+5:30
पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस दरवर्षी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जाहीर करत असतो. मात्र, पालिका सभागृह विसर्जित झाल्यामुळे गेली तीन वर्षे मुख्यमंत्री बोनसची घोषणा करीत आहेत.

पालिका कर्मचारी अनुदानात चार वर्षांत १३ हजारांची वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे. इतर कामगार संघटनांकडून तसेच कामगारांच्या समन्वय समितीच्या माध्यमातूनही महापालिका आयुक्तांकडे सानुग्रह अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत सानुग्रह अनुदानाच्या रकमेत झपाट्याने वाढ होऊन ती १५ हजार ५०० रुपयांवरून २०२४ मध्ये रक्कम २९ हजार रुपयांवर पोहोचली आहे. एकूणच चार वर्षांत सानुग्रह अनुदानात जवळपास १३ हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात कितीची वाढ होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस दरवर्षी महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जाहीर करत असतो. मात्र, पालिका सभागृह विसर्जित झाल्यामुळे गेली तीन वर्षे मुख्यमंत्री बोनसची घोषणा करीत आहेत. पूर्वी बोनसच्या रकमेत दरवर्षी जेमतेम पाचशे रुपये वाढ होत होती. गेल्या काही वर्षांत यात जवळपास तीन हजारांची वाढ होत आहे. त्यामुळे मागील वर्षी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे २५० कोटी रुपयांचा भार पडला. पालिका प्रशासनाने यंदाही २९ हजार रुपयांप्रमाणेच सानुग्रह अनुदान देण्याची तयारी दर्शवली असून, त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
दुपटीपेक्षा अधिक अनुदान देण्याची केली मागणी
दि म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण १ लाख ४५ हजार कामगारांची पदे आहे; परंतु यातील अनेक पदे रिक्त असून आता केवळ ८५ हजार कामगार, कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत.
त्यातच यंदा महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे यात वाढ होईल, अशी शक्यता असली तरी यापूर्वीप्रमाणे सरासरी तीन हजारांप्रमाणे वाढ मिळते की त्यापेक्षा अधिकार वाढ की आहेत तेवढीच राखली जाते, हे स्पष्ट होणार आहे.