पालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये? अधिवेशनानंतर भाजप करणार जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 09:45 AM2023-08-04T09:45:17+5:302023-08-04T09:47:13+5:30

गेले अनेक महिने प्रलंबित असलेल्या राज्यातील २८ पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Municipal elections in November After the convention BJP will make strong preparations | पालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये? अधिवेशनानंतर भाजप करणार जोरदार तयारी

पालिका निवडणुका नोव्हेंबरमध्ये? अधिवेशनानंतर भाजप करणार जोरदार तयारी

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई :

गेले अनेक महिने प्रलंबित असलेल्या राज्यातील २८ पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबरला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपने अंतर्गत सर्वेक्षण केले असून, पालिकेच्या आगामी निवडणुकीचा आराखडाही निश्चित केला असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’ला दिली. ८ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी समाप्त झाला. पालिकेची सूत्रे प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेच्या निवडणुका कधी लागणार, याकडे माजी नगरसेवक आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

मुंबई  महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आपला महापौर विराजमान व्हावा, यासाठी मुंबईत १५० जागा जिंकून आणण्याचा संकल्प मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. उद्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पालिकेच्या आगामी निवडणुकीची भाजप जोरदार तयारी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भाजपच्या कोर कमिटीने पालिका निवडणुकीचा कसून अभ्यास केला आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीत २२७ जागा असतील, हे गृहीत धरून भाजप पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मुंबईत २८ टक्के मराठी मतदार आहेत, अशी माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप १३८ जागांवर मराठी उमेदवार उभे करणार असल्याचे ठरले असून, त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचे समजते. आगामी निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. जुन्या माजी नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळणार का? तेच तेच उमेदवार देणार याकडे लक्ष लागले आहे.

सर्वेक्षणातून काय आले पुढे?
मुंबईत भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र मिळून पालिकेची निवडणूक लढणार आहे.
२२७ पैकी १११ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होतील, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट, समाजवादी पार्टी यांच्या आघाडीला १०० जागांवर यश मिळू शकते, असा दावा यात केला आहे. 
न्यायालयात असलेला ओबीसींचा निकाल या महिन्यात लागण्याची शक्यता असून, निकाल काही लागला तरी आगामी पालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढायची भाजपची मानसिकता असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Web Title: Municipal elections in November After the convention BJP will make strong preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.