Join us

...तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संताप, निकालाबद्दल काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:23 IST

वरळीत पार पडला पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीसंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे. महापालिकेवर नेमलेले प्रशासक सरकारचेच असल्यामुळे त्यांना निवडणुकीची गरज नाही. प्रशासकच सगळ्या गोष्टी पाहत असताना नगरसेवकांची ओझी कोण उचलणार ? त्यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी वर्तविले.

वरळी येथील डोम सभागृहात मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्याला महिला आणि तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पक्षाने जी आंदोलने केली, निर्णय घेतले त्या गोष्टी सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजे. लोकांनी प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणे योग्य नाही. निवडणुकीसाठी आतापासूनच खर्च करत बसू नका. आजूबाजूला काय सुरू आहे ते बघा. जनतेच्या संपर्कात राहा, असा सल्ला राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

...तर निवडणुका न लढविलेल्या बऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ठाकरे म्हणाले, “विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच इतका सन्नाटा पसरला होता. भाजपला १३२ जागा मिळाल्या हे समजू शकतो. पण, अजित पवार यांना ४२ जागा ? ज्यांच्या जिवावर यांनी राजकारण केले त्या शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा ? लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार जिंकले, त्यांचे १५ आमदार आले ? चार महिन्यांत लोकांच्या मनात इतका फरक पडला ? काय झाले, कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे.”  लोकांनी आपल्याला मतदान केले फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही. अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढविलेल्या बऱ्या, असेही ठाकरे यांनी नमूद केले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे