महापालिका निवडणूक आली...! प. उपनगरात भाजप घरोघरी फराळ वाटायला घेऊन गेली, विरोधक म्हणतायत...
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 16, 2025 12:21 IST2025-10-16T12:21:38+5:302025-10-16T12:21:49+5:30
उटणे आणि फराळ वाटपाबरोबरच अनेक ठिकाणी किल्ले-रांगोळी स्पर्धा, तर कुठे दिवाळी पहाट, दीपोत्सवाचे आयोजन भाजपने केले आहे.

महापालिका निवडणूक आली...! प. उपनगरात भाजप घरोघरी फराळ वाटायला घेऊन गेली, विरोधक म्हणतायत...
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम उपनगरात दिवाळीपूर्वी घरोघरी फराळाचे वाटप सुरू केले आहे. भाजपच्या या मतपेरणीवर विरोधकांना आगपाखड करत आक्षेप नोंदवला आहे.
उटणे आणि फराळ वाटपाबरोबरच अनेक ठिकाणी किल्ले-रांगोळी स्पर्धा, तर कुठे दिवाळी पहाट, दीपोत्सवाचे आयोजन भाजपने केले आहे. यात माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाल्याचे दिसत आहे. मुंबई भाजपतर्फे पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मालाड, गोरेगाव, दिंडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम भागांत तसेच झोपडपट्ट्यांमध्ये मोफत फराळाचे वाटप करण्यात येत आहे. त्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढविला जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांची माहिती त्यांचे कार्यकर्ते देत आहेत.
उद्धवसेना, काँग्रेसकडून टीका
विरोधकांनी या फराळ वाटपावर जोरदार टीका केली आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत करण्याचे सोडून आगामी महापालिका निवडणुकीत मतांसाठी हा फराळ वाटपाचा खटाटोप चालला आहे, अशी टीका उद्धवसेनेचे आ. सुनील प्रभू यांनी केली आहे. भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असल्याचे ते म्हणाले.
पूरग्रस्तांना फराळ वाटप करण्याऐवजी मुंबईकरांना घरोघरी फराळ वाटप करून मतांचा जोगवा मागण्याचा भाजपचा डाव असल्याचे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. भाजपला कोणतीही संवेदना राहिलेली नाही. मतांशिवाय त्यांना राहवत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.