यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिका निवडणुकीत आमचे भाजपचे मित्रपक्ष भाजपच्या विरोधात लढले; पण निकालानंतर या मित्रांना आवश्यक तिथे नक्कीच सोबत घेऊ. आमच्या तीन पक्षांचे मिळून २९ पैकी २७ महापालिकांमध्ये महापौर बसतील. मात्र, काँग्रेस, उद्धवसेना, मनसे असे विरोधक असलेल्या कोणत्याही पक्षासोबत निवडणुकीनंतर महापालिकांत युती केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीत कुठे एकनाथ शिंदेंची शिंदेसेना वा कुठे अजित पवार यांची राष्ट्रवादी ही भाजपच्या विरोधात लढली; पण शेवटी ते आमचे मित्रपक्ष आहेत. निकालानंतर एकत्रितपणे आम्ही महापालिकेचा कारभार करायला हवा, असे मला वाटते. निवडणुकीपुरते आमचे मित्र काही ठिकाणी विरोधात लढलेही असतील; पण ते कायमचे विरोधक नाहीत. आमच्या पक्षालाही हीच भूमिका मी सांगणार आहे. त्यानुसार २९ पैकी २७ महापालिकांमध्ये महायुतीचा महापौर असेल. त्यात सर्वाधिक महापौर हे भाजपचे असतील. भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल.
निवडणुकीत ‘बटेंगे तो कटेंगे’ हा मुद्दा आहेच... अधिकाऱ्यांच्या आंतरमहापालिका बदल्या करणार
महापालिका निवडणुकीनंतरही अजित पवार सरकारमध्ये राहतील का? कारण, सध्या वेगळी चर्चा आहे...
फडणवीस : अजित पवार हे शंभर टक्के सरकारमध्ये राहतील, २०२९ पर्यंत राहतील आणि २०२९ मधील निवडणूकही आम्ही सोबतच लढू. ते पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि पुणे व पिंपरी-चिंचवडची निवडणूक ते साम, दाम, दंड, भेद वापरून लढत आहेत. ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. मी २०१७ च्या तेथील निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरलो होतो. आता आमचे तेथील लोकच ताकदवान आहेत. ते अजित पवारांविरुद्ध समर्थपणे लढत आहेत. मी पाहिजे ती मदत त्यांना करतो आहे. सभादेखील घेणार आहे; पण गळेकापू अशा पद्धतीने आम्ही काही ही लढाई नाही करत आहोत. मी त्यांच्या वादाला कुठेही प्रतिवाद करत नाही. विकासाचा अजेंडा मांडत आहे.
अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली की ते त्याच महापालिकेत निवृत्त होतात, त्यांच्या आंतरमहापालिका बदल्या करणार का?
फडणवीस : नक्कीच करणार. आम्ही लवकरच त्या बाबतचा निर्णय करू. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिल्याने इंटरेस्ट तयार होतात, त्यावर हा उपाय असेल. शहर अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य आरोग्य अधिकारी, मुख्य अग्रिशमन अधिकारी आदी धोरणांशी निगडित महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांची अन्य महापालिकांत बदली होईल.
या निवडणुकीनंतर ठाकरे संपतील वा कालबाह्य होतील, असे आपल्याला वाटते का?
फडणवीस : ठाकरे बंधू कालबाह्य होतील, असे मी अजिबात म्हणणार नाही. तशी अपेक्षाही कोणी करू नये. राजकारणात वेगवेगळी परिस्थिती येत असते. गेल्या २५ वर्षांत ठाकरे मुंबईला फार काही देऊ शकले नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. त्यामुळे लोक नक्कीच आम्हाला निवडून देतील. कारण, आमचे काम त्यांनी पाहिले आहे. त्यांच्याविषयी नकारात्मकता तर आमच्याविषयी सकारात्मकता मतदारांमध्ये आहे. पुढच्या ५ वर्षांत आम्ही काही चुका केल्या तर लोक त्यांना निवडून देतील; पण आम्ही चुका करणार नाही.
विधानसभेला ‘बटेंगे तो कटेंगे’ याची चर्चा खूपच झाली होती. महापालिका निवडणुकीतही हा मुद्दा आहे, असे आपल्याला वाटते का?
फडणवीस : काही प्रमाणात तर नक्कीच हा मुद्दा आहे. हा मुद्दा का आला, कारण उद्धवसेना आणि काँग्रेस हे तुष्टीकरण, लाळघोटेपणा करत आहेत व त्यांच्यात याबाबत स्पर्धा आहे, त्यामुळे हा मुद्दा प्रमुख झाला. आम्ही तुष्टीकरणाविरुद्ध आहोत. धर्मविशेषाचे तुष्टीकरण आम्हाला मान्य नाही. विधानसभेत त्यांनी तेच केले, त्याचा त्यांनाच फटका बसला. बटेंगे तो कटेंगेचा अर्थ लोकांना नीट कळलेला आहे. ज्यांनी विकास करून दाखवला त्यांच्या पाठीशी लोकांनी उभे राहावे, असे माझे आवाहन आहे.
Web Summary : BJP will ally with friendly parties after local elections. Fadnavis predicts victory in most corporations, excluding opposition alliances. He affirms Ajit Pawar's continued government presence and anticipates success despite competition in Pune. He also plans inter-municipal transfers for key officers to tackle corruption.
Web Summary : चुनाव के बाद भाजपा मित्र दलों के साथ गठबंधन करेगी। फडणवीस ने विपक्ष को छोड़कर अधिकांश निगमों में जीत की भविष्यवाणी की। उन्होंने अजित पवार की सरकार में निरंतर उपस्थिति की पुष्टि की और पुणे में प्रतिस्पर्धा के बावजूद सफलता की उम्मीद जताई। भ्रष्टाचार से निपटने के लिए प्रमुख अधिकारियों के अंतर-नगरपालिका स्थानांतरण की भी योजना है।