Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शिक्षण विभाग यंदा करणार ७० % वह्यांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 18:27 IST

विद्यार्थी स्थलांतरित झाल्यामुळे सध्यस्थितीत निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य नसल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने १० ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना ७० टक्के वह्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकापाठोपाठ आता लवकरच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वह्याही उपलब्ध होणार आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थी स्थलांतरित झाली असल्याने त्यांना ते पुन्हा मुंबईत परतल्यानंतर उर्वरित ३० टक्के वह्या व पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू कधी होईल याबाबत अनिश्चितता असली तरी ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत.  मुंबई महापालिका शाळांत तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शिक्षण विभागाच्या माध्यमातून वह्या, पुस्तके, पेन, पॅन्सिल ,बूट अशा २७ शालेय वस्तुंचा पुरवठा करण्यात येतो. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, पेन, पॅन्सिल रबर आदी वस्तुंचे लवकर वाटप करणे शक्‍य होईल, असेही शिक्षण विभागाने म्हटले होते. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तकांचे वाटप केले होते आता वह्यांचे वाटप शिक्षण विभागाकडून केले जाणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक विद्यार्थी पालकांसह आपल्या गावी गेले असून, हा आकडा  जवळपास ३० टक्क्यांच्या आसपास असल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे मुंबईतील असलेल्या ७० टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या वह्यांचे वाटप करण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार १० ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत वह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. वह्यांचे वाटप सुरळीत व्हावे यासाठी पालिकेकडून प्रत्यके विभागानुसार तारीख निश्चित केली असून, त्या तारखेला या वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १०० टक्के असेल त्या शाळांमध्ये १०० टक्के विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांचे वाटप ज्या प्रमाणात झाले त्याचप्रमाणात वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणसाठी सध्या पाठ्यपुस्तके व वह्या यांची आवश्यकता असल्याने ती विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी २१ शालोपयोगी साहित्यांपैकी उर्वरित साहित्यही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईशिक्षणशिक्षण क्षेत्र