नगरपरिषद निकालाने वाढवला भाजप, शिंदेसेनेचा आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 10:30 IST2025-12-22T10:30:07+5:302025-12-22T10:30:26+5:30
महापालिकेसाठी सज्ज असल्याचा नेत्यांचा दावा; महायुतीचा महापौर करण्याचा संकल्प

नगरपरिषद निकालाने वाढवला भाजप, शिंदेसेनेचा आत्मविश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील नगर परिषद आणि नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला घवघवीत यश मिळाल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मुंबईतील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचे चित्र आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयात पेढे वाटून जल्लोष केला. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनीही नरिमन पॉइंट येथील बाळासाहेब भवन या
प्रदेश कार्यालयात विजयाचा आनंद साजरा केला.
मुंबई भाजप अध्यक्ष आ. अमित साटम यांनीही, आता मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार, असा विश्वास व्यक्त केला. या निवडणुकीत ८० टक्के जागा या भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने म्हणजेच महायुतीने जिंकल्या असल्याने नगरपरिषद, नगरपालिका तो झाँकी है, मुंबई महापालिका का पिक्चर अभी बाकी है, असे सांगत मुंबई महापालिका निवडणुकीला महायुती सज्ज झाल्याचे साटम यांनी पत्रकारांशी बोलताना
स्पष्ट केले.
युती-आघाड्यांची
चर्चा अंतिम टप्प्यात
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या युती-आघाड्यांची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरले जातील. नगर परिषद निकालाने महायुतीचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते उल्हासित झाले आहेत.
‘पालिकांत भगवा फडकेल’
मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढणार आणि महायुतीचाच महापौर होईल. सोमवारपासून चर्चेची फेरी सुरू होईल.
नगर परिषद निकालामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे शिंदेसेनेचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. २९ महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकेल, असेही ते म्हणाले.