स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची ‘वॉर रूम’; सागरी किनारी रस्ता, महामार्गांच्या सफाईवर भर द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 13:29 IST2026-04-10T13:27:53+5:302026-04-10T13:29:14+5:30
आयुक्त अश्विनी भिडेंचे प्रशासनाला निर्देश

स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची ‘वॉर रूम’; सागरी किनारी रस्ता, महामार्गांच्या सफाईवर भर द्या!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईची स्वच्छता प्रभावीपणे करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात यावी आणि ती योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी सहायक आयुक्तांनी नियमितपणे आपल्या विभागात महत्त्वाच्या ठिकाणी भेटी द्याव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गुरुवारी दिले.
आयुक्त भिडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विविध प्रकल्प, उपक्रम आणि कामकाजाचा आढावा महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत घेतला. महापालिका आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त प्रशांत गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर, संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शहराची स्वच्छता नियमित आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. मुंबईतील सागरी किनारी रस्ता व महामार्गांवर चांगली स्वच्छता झाली पाहिजे, असे भिडे यांनी सांगितले.
९८८ वाहनांद्वारे कचरा संकलन, वाहतूक
यावेळी दिघावकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. सध्या मुंबईतून सुमारे ७,२०० मेट्रिक टन घनकचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. संपूर्ण मुंबईत उत्तम प्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सेवा आधारित कंत्राट पद्धती अवलंबिण्यात आली आहे.
घनकचरा संकलन व वाहून नेण्यासाठी नवीन वाहने आणली आहेत. पूर्वी यासाठी एक हजार १९६ वाहने कार्यरत होती. आता या वाहनांची सख्या ९८८ वर आली आहे.
मुंबईत ४६ ठिकाणी सुका कचरा विलगीकरण केंद्रे आहेत; तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. सॅनिटरी कचरा संकलनासाठी पालिकेकडून विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
‘मुंबई क्लीन लीग’मध्ये सर्वांनी सहभागी व्हा!
शहर परिसरातील स्वच्छता मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी ‘मुंबई क्लीन लीग’ या स्पर्धेत नागरिक तसेच आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही अश्विनी भिडे यांनी केले. तसेच महापालिका प्रशासनालाही सूचना केल्या आहेत.
४६ जागी सुका कचरा विलगीकरण केंद्रे आहेत; तर, ९४ वाहने यासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. पावसाळ्यात पाणी निचरा सुरळीत व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असल्याचेही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.