Join us

महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 06:23 IST

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकपूर्व तयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला. महानगरपालिका प्रशासनाने केलेली पूर्वतयारी परिपूर्ण असल्याचे नमूद करत, आयोगाने समाधान व्यक्त केले.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूकपूर्व तयारीच्या कामांची माहिती दिली. मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण मतदार संख्या व मतदान केंद्र आदींबाबत दिनेश वाघमारे यांनी समाधान व्यक्त केले.

गगराणी यांचे अभिनंदनमागील विधानसभा निवडणुकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाने गौरव केला, त्याबद्दल वाघमारे यांनी गगराणी यांचे अभिनंदन केले.

मतदानाची टक्केवारी वाढवामतदान केंद्रांवरील सुविधा वाढवून त्याची प्रभावी जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून मतदानाची टक्केवारी वाढेल.मागील सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आलेल्या अडचणींचे निराकरण कशा प्रकारे झाले, याचा विचार करून यंदा अधिक सक्षम उपाययोजना राबवाव्यात. मतदान प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी, यासाठी उपाय योजना कराव्यात, असे निर्देश वाघमारे यांनी दिले.

टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२५मुंबईमहाराष्ट्र