फांद्यांची छाटणी होणार मोफत, मात्र दुर्घटनेची जबाबदारी झटकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:10 IST2025-05-30T12:10:09+5:302025-05-30T12:10:45+5:30
मुंबई : खासगी जागेवरील झाडांच्या छाटणीची जबाबदारी आतापर्यंत जागामालकाची होती. मात्र, यापुढे खासगी जागेतील किंवा सोसायटीतील धोकादायक वृक्ष छाटणीदेखील ...

फांद्यांची छाटणी होणार मोफत, मात्र दुर्घटनेची जबाबदारी झटकली
मुंबई : खासगी जागेवरील झाडांच्या छाटणीची जबाबदारी आतापर्यंत जागामालकाची होती. मात्र, यापुढे खासगी जागेतील किंवा सोसायटीतील धोकादायक वृक्ष छाटणीदेखील पालिका सामाजिक जबाबदारी म्हणून निःशुल्क करून देणार आहे. मात्र, भविष्यात खासगी जागेत धोकादायक झाडांमुळे दुर्घटना झाल्यास त्यासाठी महापालिका जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून एकाच वेळी घेण्यात आलेल्या या दोन्ही भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सोमवारच्या मुसळधार पावसानंतर खासगी आवारातील झाडाची फांदी अंगावर पडून एक २६ वर्षीय नोकरदाराचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीत घडली. त्यामुळे पावसाळ्यात धोकादायक झाडांची आणि फांद्यांची छाटणी न करण्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणावरील वृक्ष छाटणीचे काम हाती घेतले जाते. मात्र, खासगी जमिनीवरील धोकादायक वृक्ष छाटणीसाठी पालिकेकडून संबंधितांना नोटीस दिली जात होती. पालिकेकडून ही छाटणी करून घ्यायची असल्यास पालिका संबंधित खासगी जागा मालकांकडून अथवा सोसायटीकडून शुल्क आकारत होती. मात्र, हे शुल्क जास्त असून, हे काम निःशुल्क व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली होती. त्यातच अनेक खासगी जागेवरील वृक्ष छाटणीला बगल दिली जात असल्याने मुसळधार पावसात दुर्घटनांची भीती वाढली होती.
परिपत्रकात काय?
पादचारी, वाहतूक आणि महापालिकेच्या मालमत्तेसाठी धोकादायक वाटणाऱ्या सर्व झाडांचे सर्वेक्षण करण्यात येईल. खासगी जागेतील, सोसायटीतील अशा धोकादायक झाडांसंदर्भात संबंधित मालकाला लेखी नोटीस देण्यात येईल. दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास पालिकेकडून सामाजिक जबाबदारी म्हणून ते काम पार पाडण्यात येईल.
कंत्राटदारामार्फत होणार कार्यवाही
पालिकेने पुढाकार घेऊन खासगी जागेतील धोकादायक झाडे आणि त्यांच्या फांद्यांची छाटणी मोफत करावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली. ही मागणी मान्य झाली असून, प्रशासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ही कामे उद्यान विभागाने नेमलेल्या कंत्राटदाराद्वारे करण्यात येईल, असे पालिकेने जाहीर केले आहे.