महापालिकेची वृक्षलागवड कागदावरच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:50 IST2026-03-23T11:50:37+5:302026-03-23T11:50:46+5:30
भुलेश्वर, मुंबादेवीत कमी, तर पश्चिम उपनगरात जास्त

महापालिकेची वृक्षलागवड कागदावरच!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून २०२४-२५ या वर्षात मुंबई आणि उपनगरात मिळून झाडांची संख्या २९ लाख ७५ हजार असल्याचे पर्यावरण अहवालात जाहीर करण्यात आले आहे. मात्र, मागील ४ वर्षापासून प्रत्येक वॉर्डातील आणि एकूण झाडांची संख्या सारखीच असल्याचे अहवालातून समोर आले आहे. पालिकेकडून होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात मुंबईकर रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे वृक्ष लागवड होत असेल तर पालिका वृक्षलागवड नेमकी कुठे करते? आणि करत असेल तर ही वृक्षलागवड फक्त कागदावरच आहे का? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
मुंबई शहर हे किनारी शहर म्हणून ओळखले जाते आणि म्हणून पूरस्थिती रोखण्यासाठी, तसेच उन्हाच्या काहिलीपासून संरक्षणासाठी मुंबई अधिक हिरवीगार होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कधी मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी तर कधी पूल, रस्ते, धरण प्रकल्पासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. मुंबईकरांकडून या प्रकल्पांना विरोध होऊन आंदोलनेही उभारली जात आहेत.
कुठे झाडे कमी, कुठे जास्त
महापालिकेच्या बी वॉर्डमध्ये मोहम्मद अली रोड, डोंगरी, भेंडी बाजार भागात केवळ सात हजार ८१६ झाडे आहेत, तर सी वॉर्डमध्ये भुलेश्वर, मुंबादेवी, लोहार चाळ आदी भागांत केवळ पाच हजार ७५६ झाडे आहेत. शहरातील इतर भागातही झाडांची संख्या उपनगरांच्या तुलनेत कमीच आहे.
उपनगरातील अनेक भागांत झाडांची संख्या घाटकोपरमध्ये जास्त असल्याचे स्पष्ट झाले असून त्यानंतर मालाड आणि बोरिवली भागातही झाडांची संख्या अधिक आहे.
मियावाकी वने उभारणार
मुंबईतील वृक्षसंपदा सातत्याने कमी होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमी करत असताना महापालिकेकडून मात्र वृक्षलागवडीचा दावा होत आहे. महापालिकेने जपानी पद्धतीची मियावाकी वने उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजपर्यंत या पद्धतीने पाच लाखांहून अधिक झाडे लावली आहेत.