कबुतरखान्यांकडून ४७ हजारांचा दंड वसूल महापालिकेची वर्षभरात कारवाई 

By सीमा महांगडे | Updated: December 29, 2024 14:25 IST2024-12-29T14:24:02+5:302024-12-29T14:25:38+5:30

मुंबईत भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही अनेक उघड्या जागांमध्ये चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. तसेच सोसायट्यांच्या, धान्य विक्री दुकानांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कबुतरे आढळतात.

Municipal Corporation takes action within a year to recover fine of Rs. 47,000 from pigeon houses | कबुतरखान्यांकडून ४७ हजारांचा दंड वसूल महापालिकेची वर्षभरात कारवाई 

कबुतरखान्यांकडून ४७ हजारांचा दंड वसूल महापालिकेची वर्षभरात कारवाई 

मुंबई : कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणारे घटक आरोग्यास अपायकारक असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. हे लक्षात घेऊन कबुतरांना दाणे, धान्य टाकून जमा करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेने गेल्या वर्षी घेतला असून या मोहिमेत आतापर्यंत ४७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ४८ कबुतरखान्यांबाबत ८३ तक्रारी पालिकेकडे नोंदवण्यात आल्या असून नियम मोडणाऱ्यास १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला आहे.

मुंबईत भुलेश्वर, दादर, माहीम, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून कबुतरखाने आहेत. याशिवाय शहराबरोबरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही अनेक उघड्या जागांमध्ये चणे, गहू, तांदूळ, डाळ असे खाद्य कबुतरांना घालण्यात येते. तसेच सोसायट्यांच्या, धान्य विक्री दुकानांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कबुतरे आढळतात. 

कबुतरांच्या विष्ठेतून निघणारा ॲस्परजेलिस हा घटक विषारी असल्याचे संशोधनात समोर आले आहे. दुसऱ्या बाजूला कबुतराला धान्य टाकणाऱ्यांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे अनेक वर्षांपासून केल्या जात होत्या. पण, कुठलीही त्यावर कारवाई होत नव्हती. अखेर मागील वर्षी डिसेंबरमध्ये असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी प्रत्येक प्रभागात क्लीनअप मार्शलची नियुक्तीही करण्यात आली. कुणी व्यक्ती कबुतरांना दाणे, धान्य घालताना आढळल्यास थेट कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे निश्चित झाले. या पार्श्वभूमीवर वर्षभरात पालिकेकडून ४७ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

फलक फक्त दिखाव्यासाठी !
-     मुंबईत शेकडो कबुतरखाने आहेत. मात्र पालिकेकडे फक्त शहरात आणि उपनगरांतील ४८ कबुतरखान्यांची नोंद आहे. 
-     शेकडो तक्रारी येऊनही अशा बेकायदा कबुतरखान्यांवर कारवाई करण्याची पालिका प्रशासनाची हिंमत होत नाही. 
-     याला कबुतरप्रेमी समाजच नाही तर, या मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवणारे राजकीय पक्षही कारणीभूत असल्याचे मत ‘मूळ मुंबईकर’ या समाजमाध्यमांवर कार्यरत असलेल्या सामाजिक संघटनेने व्यक्त केले आहे. 
-     महापालिकेने दादरसह अन्य कबुतरखान्याबाहेर दंडात्मक कारवाईचे फलक लावले आहेत. 
मात्र, हे फलक फक्त दिखाव्यापुरतेच आहे. 
-     पालिकेने यासाठी धोरण ठरवून त्याच्या अंमलबजावणीची मागणी संघटनांकडून केली जात आहे.
 

Web Title: Municipal Corporation takes action within a year to recover fine of Rs. 47,000 from pigeon houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.