कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 05:47 IST2026-01-10T05:47:39+5:302026-01-10T05:47:39+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे.

कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे: मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे. काही प्रभागांत या दोन्ही पक्षांना काँग्रेस व वंचित आघाडीचे आव्हान आहे.
मुंबईतील या तिरंगी लढतीमध्ये प्रचारात मुंबईचे निर्णय मुंबईकरांसाठी व्हावेत, मराठी माणसाची नोकरी, व्यवसाय व शहरावरील त्यांचा हक्क अबाधित राहावा, हा प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. याखेरीज मुंबईतील विकासकामे हाही मुद्दा सत्ताधारी पक्षाकडून हिरिरीने मांडला जात आहे. ठाण्यात वाहतूककोंडी व पाणीटंचाई हे मुख्य मुद्दे आहेत तर कल्याण-डोंबिवलीत प्रदूषण, बिनविरोध नगरसेवक निवड आणि अनधिकृत बांधकामे हे गंभीर मुद्दे आहेत.
मुंबई : विकासकामे विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप
महापालिकेतील २५ वर्षांच्या सत्तेत ठाकरेंनी परप्रांतीय ठेकेदारांना कंत्राट देऊन पैसे उकळले. कोविडकाळात मोठा भ्रष्टाचार केला. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो रेल, बीडीडी चाळ व धारावी पुनर्वसन ही विकासकामे
लाडकी बहीण योजना.
ठाणे : वाहतूककोंडी, पाणीटंचाई याचीच चर्चा
शहरातील व मुख्यत्वे घोडबंदर रोड व नाशिक रोडवरील वाहतूककोंडी आणि नव्याने विकसित झालेल्या परिसरातील टॉवरमधील तीव्र पाणीटंचाई. कोस्टल रोड, अंतर्गत मेट्रो प्रकल्पाची मागणी. कचरामुक्त ठाणे केव्हा होणार? दिवा, मुंब्रा व कळवा परिसरातील अनधिकृत बांधकामे.
कल्याण : बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत बिनविरोध सदस्य निवडीवरून मतदारांत संताप. प्रदूषणाची समस्या तीव्र असून, त्याबाबत पर्यावरणप्रेमी आक्रमक आहेत. अनधिकृत बांधकामांची वाढती संख्या, २७ गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका कधी होणार?, रस्त्यांतील खड्डे व दरवर्षी होणारे अपघात.
उल्हासनगर : गुंडाराज हाच डाग आजही कायम
उल्हासनगर शहराचे नाव राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामुळे महाराष्ट्राला ठाऊक झाले. एकेकाळी पप्पू कलानी यांचे नाव या वादाशी जोडले गेले होते. महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, ओमी कलानी टीम व साई पक्षाची युती असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरातील गुन्हेगारीकरण हा मुद्दा उपस्थित केला. अर्थात मागील महापालिका निवडणुकीनंतर भाजपने कलानी यांचा हात सत्तेकरिता हाती घेतला असल्याने हा मुद्दा बोथट करण्याची संधी शिंदेसेनेला आहे. अनधिकृत बांधकामांचे फुटलेले पेव, तीव्र पाणीटंचाईने त्रस्त नागरिक.
नवी मुंबई : सिडकोच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास हवा
सर्वच पक्षांनी सिडकोच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासह प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची घरे नियमित करण्याची तसेच कॉलनीतील बैठ्या घरांवर केलेली वाढीव बांधकामे नियमित करण्याचा मुद्दा चर्चेत आणला आहे. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करा. सर्वांना २४ तास पाणीपुरवठा करा, प्रशासकीय राजवटीत नको त्या कामांवर केलेल्या खर्चाचे ऑडिट यूडीसीपीआर, एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावलीत दिलेल्या वाढीव चटई क्षेत्रातून झालेला बट्ट्याबोळ, नवी मुंबईत राजकीय घराणेशाहीने झालेले नुकसान.
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी हीच प्रमुख समस्या
मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी, त्यातून होणारे अपघात व मृत्यू. बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य, अनधिकृत गोदामे, त्यामुळे लागणारी आग.
पनवेल : वाढीव मालमत्ता कराने मतदार बेजार, अपुरा पाणीपुरवठाही
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला नऊ वर्षांचा कालावधी लोटला. यंदाची दुसरी सार्वत्रिक निवडणूक असून, वाढीव मालमत्ता कराचा मुद्दा पेटला आहे. तो पूर्ण माफ करावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. पनवेल शहरात विशेषत: खारघर, कामोठे परिसरात होणारा अपुरा पाणीपुरवठा खारघर, तळोजा परिसरातील वाढलेले प्रदूषण.
मिरा-भाईंदर : मेट्रोसह घोटाळ्यांच्या मुद्द्याभोवती फिरतोय प्रचार
मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार रखडलेला मेट्रो प्रकल्प, तीव्र पाणीटंचाई आणि महापालिकेच्या कारभारातील घोटाळे या मुद्द्यांभोवती फिरत आहे. येत्या सहा महिन्यांत सूर्या योजनेचे पाणी मिळणार हा दावा, भाजप आमदारामुळे रखडलेली मेट्रो, वाहतूककोंडी व रस्त्यांचे खड्डे.
वसई-विरार : पाणीटंचाई, इमारत पुनर्विकासावर उमेदवार देत आहेत भर
स्वच्छता, पाणी, खड्डे, वाहतूककोंडी, क्लस्टर, अनेक धोकादायक इमारतींचा पुनर्विकास.